बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

जागतिक दर्जाचे डबेवाला एक्सपिरीयंस सेंटर उभारणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई डबेवाला भवनच्या एक्सपिरिएंस सेंटरचे भूमीपूजन

डबेवाल्यांचे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण करू

मुंबई,

मुंबईचे वैभव म्हणून गेट वे ऑफ इंडिया, सीएसटी, वरळी सी लिंक याकडे पाहिले जात असले तरीही जीवंत माणसं हे खरे वैभव असते. डबेवाला हे मुंबईचे खरे वैभव आहे. त्यांचे असामान्य कार्य लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे डबेवाले जरी तंत्रज्ञान वापरत नसतील तरी त्यांचे एक्सपिरीयंस सेंटर तंत्रज्ञान वापरून जागतिक दर्जाचे उभारू, यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुंबई डबेवाला भवनच्या एक्सपिरिएन्स सेंटरचे भूमीपूजन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार श्रीकांत भारतीय, नगरसेविका सपनाताई म्हात्रे, मुंबई डबेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष सोपानकाका मरे, नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे नवीन अध्यक्ष उल्हास मुके, मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, डबेवाले कंप्युटर पेक्षा हुशार आहेत. एकही चूक न होता ते अचूक काम करतात, म्हणून जगभरातील विद्यापीठे, नेते त्यांच्या व्यवस्थापन तंत्राचा अभ्यास करतात. जगभर या असामान्य कामाचे कौतुक केले जाते. डबेवाल्ल्यांपर्यंत पोहचायला १०-१५ वर्ष उशीर झाला असला तरी आता डबेवाल्यांशी तयार झालेला ऋणानुबंध कायम राहील. नैसर्गिक आपत्तीमध्ये डबेवाल्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत स्वखर्चातून मदत केली. डबेवाल्यांना घरे मिळवून देण्यासही उशीर झाला, पण आता लवकरच त्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण होईल. तिन्ही रेल्वे लाईनवर घरांची योजना राबविण्यात येईल. महाराष्ट्र धर्म, स्वधर्म हा वारकरी संप्रदायामुळे ताठ मानेने उभा आहे. वारकरी वारी चुकवत नाही तसे डबेवाले रोज डबा पोहोचवून वारी करतात. त्यांच्या कामातून रोज वारी घडते.

यावेळी आमदार श्रीकांत भारतीय प्रास्ताविक करताना म्हणाले, मुंबईच्या जीवनात भागवत धर्माची पताका जीवंत ठेवण्याचे काम मुंबई डब्बेवाला यांनी केले आहे. विश्वासार्हता हा डबेवाला यांचा युनीक सेलिंग पॉईंट आहे.

मुंबई डबेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष सोपानकाका मरे म्हणाले, डबेवाला संघटनेला १२५ वर्षाची वैभवशाली परंपरा आहे. या संघटनेसाठी ५२ वर्ष काम करीत असताना २५ वर्ष अध्यक्ष म्हणून राहिलो. डबेवाले घरापासून वंचित आहेत. ८० टक्के लोक भाड्याने राहतात. आमचे घराचे स्वप्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साकार करतील याची खात्री आहे, असे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button