नागपूरमहाराष्ट्र
Trending

समृद्धी महामार्ग तयार केल्याबद्दल शेतकऱ्यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारचे आभार

समृद्धी महामार्ग तयार केल्याबद्दल शेतकऱ्यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारचे आभार

महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या समृद्धी महामार्गामुळे ज्यांची भाग्यरेषा खरोखरच बदलली आशा काही शेतकऱ्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी ‘रामगिरी’वर खास स्नेहभोजनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी या शेतकरी बांधवांनी समृद्धी महामार्ग तयार करून आयुष्यात समृद्धी आणल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य शासनाचे आभार मानले. तसेच या महामार्गामुळे भविष्याची तरतूद करून आयुष्य समृद्ध झाल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना व्यक्त केली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्घाटन 11 डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर आता हा रस्त्याचा वापर लोकं करू लागली आहेत. असं असलं तरीही समृद्धी महामार्गाची घोषणा झाली होती, त्यावेळी अनेक जिल्ह्यामधून त्याला प्रखर विरोध झाला होता. मात्र त्या परिस्थितीतही बदलत्या काळाची पावलं ओळखून काही शेतकऱ्यांनी आपली जमीन या महामार्गासाठी देण्याची तयारी दर्शवली. अशा 9 गावातील सरपंच आणि शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या निवासस्थानी खास आमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी या शेतकऱ्यांशी संवाद साधून या महामार्गाचा त्यांना नक्की कसा फायदा झाला ते त्यांच्याच तोंडून जाणून घेतले. यावेळी या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर आपले म्हणणे मांडले. सगळ्यात आधी त्यांनी समृद्धी महामार्ग तयार केल्याबद्दल शासनाचे आभार मानले. तसेच आता गावातून मोठ्या शहरात जाणे अधिक सोपे झाले असल्याचे सांगितले. समृद्धी महामार्गासाठी जमीन देऊन आमच्या आयुष्यात दुप्पट समृद्धी आली असल्याचे या शेतकऱ्यांनी कबूल केले. तसेच यातील काही शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी देऊ केलेल्या जमिनीच्या दुप्पट शेती घेऊन आपले उत्पन्न दुप्पट केल्याचे सांगितले. यातील एका शेतकऱ्याने आपण चार एकर शेती समृद्धीसाठी देऊन त्याबदल्यात वीस एकर शेती, घर, गाडी घेतली तसेच वार्षिक उत्पन्न देखील कैक पटीने वाढलं असल्याचं मुखमंत्र्यांना सांगितले. तर काहींनी यापूर्वी आम्ही अल्पभूधारक शेतकरी होतो मात्र समृद्धी महामार्गाच्या आलेल्या पैशातून जास्त शेती घेऊन आम्ही सगळे बहुभूधारक शेतकरी झालो असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमचं आयुष्य गोड केल्यामुळे आम्हाला त्यांचं तोंड गोड करण्याची इच्छा असल्याचे बोलून दाखवले, त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः या शेतकऱ्यांना गोड पदार्थ भरवून आपले आयुष्य आगामी काळात अधिक समृद्ध व्हावे असे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या. समृद्धी महामार्गाची मूळ संकल्पनाच शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणणे ही होती. मात्र या जमिनीचा मोबदला देताना त्याचा शेतकऱ्यांनी योग्य विनियोग करावा आणि सगळे पैसे एकत्र खर्च करून टाकू नयेत अशी इच्छा होती. त्यामुळेच शेतकऱ्यांचे त्यावेळी सरकारच्या वतीने समुपदेशन देखील करण्यात आले होते. मात्र आज या शेतकऱ्यांचे मनोगत जाणून घेतल्यावर त्यांनी समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून आलेल्या पैशाचा अतिशय योग्य पध्दतीने वापर करून आपल्यासह आपल्या कुटूंबाच्या सर्वांगीण समृद्धीची तरतूद केली असल्याचे दिसून आल्याचे सांगून त्याबद्दल समाधान व्यक्त केले. ही फक्त सुरुवात असून समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा जी नवनगरे वसणार आहेत त्यामाध्यमातून या शेतकऱ्यांच्या आयुष्यात अजून बदल घडेल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. यावेळी एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या वॉर रुमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार आणि नऊ ग्रामपंचायतीमधील सरपंच आणि शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button