करमणूकबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

आपण देशासाठी काय देऊ शकतो ही भावना प्रत्येकाने जोपासावी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन

नागपूर, दि. 11 :

आपल्याला काय मिळाले या पेक्षा आपण देशासाठी काय देऊ शकतो ही भावना प्रत्येकाने जोपासावी. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

नागपूर विधानभवन येथे आयोजित 50 व्या सुवर्ण महोत्सवी संसदीय अभ्यास वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. संसदीय कार्य प्रणालीचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवणे हा या अभ्यासवर्गाचा उद्देश आहे. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे खजिनदार आमदार ॲड्. आशिष शेलार, विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे, सचिव विलास आठवले तसेच विविध विद्यापीठांचे विद्यार्थी, अधिव्याख्याता उपस्थित होते.

संसदीय अभ्यास वर्गात राज्याचे, देशाचे भवितव्य घडताना पाहता येत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राजकीय व्यक्ती व प्रशासनाविषयी जनमानसात आदर वाढवण्यासाठी संसदीय अभ्यासवर्गातील विद्यार्थ्यांनी प्रक्रिया समजून घ्यावी व ती लोकांपर्यंत पोहचवावी. विधानमंडळाला गौरवशाली परंपरा आहे. त्यामध्ये एक ऊर्जा आणि प्रेरणा आहे. विधानमंडळ म्हणजे जनतेसाठी एक ऊर्जा आहे. अनेक प्रश्नांवर येथे चर्चा होत असते. ती पाहण्याची व कशा प्रकारे प्रश्न सोडवले जातात हे समजून घेण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न विधानमंडळाच्या माध्यमातून करत असतो. लोकांना त्यांच्या घरी जाऊन योजनांचा लाभ देणारी ‘शासन आपल्या दारी’ ही योजना आपण सुरू केली आहे. आपण सर्वांनी समर्पित भावनेने काम करूया. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे ही शासनाची भूमिका आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देशातील सर्वोत्कृष्ट लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी देशासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. देशाला एका उंचीवर नेण्याचे काम त्यांनी केले आहे, असेही ते म्हणाले.

शासन लोककल्याणकारी अनेक योजना राबवत असते. या योजना लोकांपर्यंत पोहचण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहे. देशासाठी, राज्यासाठी, गावासाठी चांगले काही करण्याची भावना असली पाहिजे. समर्पित भावनेने काम केले पाहिजे. या अभ्यासवर्गामध्ये विधीमंडळाचे कामकाज कसे चालते, कायदे कसे निर्माण होतात हे पाहण्याची संधी मिळणार आहे. या कामकाजाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचण्याचे काम आपल्यासर्वांकडून व्हावे हाच या अभ्यासवर्गाचा उद्देश आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button