बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

परदेशी भाषेच्या प्रशिक्षणासाठी पोलीसांच्या मुलांना १० टक्के जागा राखीव –

कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, १ डिसेंबर :

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत असलेल्या ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या परदेशी भाषेच्या प्रशिक्षणासाठी पोलीसांच्या मुलांना १० टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील अशी घोषणा राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.

मुंबई पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांकरिता प्रमोद महाजन कौशल्य युवा विकास योजनेच्या माध्यमातून ताडदेव येथील पोलीस वसाहत आणि वरळी येथील मुंबई पोलीस कॉसिल्लिंग अँड प्लेसमेंट सेंटर एल विभाग ३ येथे कौशल्य प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री लोढा बोलत होते. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनावणे, सशस्त्र पोलीस दलाच्या अपर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलीस सह आयुक्त एस. जयकुमार, पोलीस उपायुक्त प्रज्ञा झेडगे, अस्मिता संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र छांजड यासह पोलीस व पोलीसांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.

मंत्री लोढा म्हणाले, पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकास विभाग आणि पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. फक्त कौशल्य शिकवणार नसून, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील यासाठी आम्ही प्रयत्न करू. नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या प्रशिक्षण वर्गाला जर चांगला प्रतिसाद मिळाला, तर यामध्ये अजून बदल करता येतील. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा. एखाद्या प्रशिक्षणार्थीला स्वयं रोजगार करावयाचा असल्यास त्याचे मार्गदर्शन करण्यात येईल, सरकारी योजना आणि त्याचे लाभ कसे घ्यायचे याचे देखील मार्गदर्शन करण्यात येईल!, असे मत मंत्री लोढा यांनी यावेळी व्यक्त केले.

कौशल्य प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून असा राबविण्यात येणार उपक्रम
पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून बृहन्मुंबईमधील ताडदेव, वरळी, नायगांव, कलिना आणि मरोळ या ठिकाणी कौशल्य प्रशिक्षण उपक्रम घेतले जातील. यामध्ये आयटी, गारमेंट, ब्युटी ॲण्ड वेलनेस, ऑटोमोटिव्ह ॲण्ड फुड प्रोसेसिंग क्षेत्रातील एकूण १० प्रकारचे प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत. किमान ३०० तास ते कमाल ५०० तासाचे कौशल्य प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातील. वय वर्षे १८ ते ४५ वयोगटातील महिला, पुरूष आपल्या आधार ओळखपत्राच्या आधारे प्रशिक्षणासाठी नोदंणी करू शकतात. या प्रशिक्षणासाठी एन. आय. सीच्या माध्यमातून बायोमेट्रीक पध्दतीने प्रशिक्षणार्थीची हजेरी घेण्यात येणार आहे. यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेद्वारास सरकारतर्फे NSQF स्टॅण्डर्डचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. प्रशिक्षणापश्चात प्रशिक्षणार्थीला रोजगार संधी, शिकाऊ प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button