बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

कोरडवाहूला एकरी २५ हजार तर बागायतीला एकरी ५० हजार रुपयांची तात्काळ मदत द्या.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र.

पंचनामे, नियम, अटी बाजूला ठेवून शेतकऱ्याला मदत जाहीर करा.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा कंपन्यांनी सरसकट नुकसान भरपाई द्यावी.

अवकाळी पाऊस व गारपिटीच्या नुकसानाने हतबल झालेल्या बळीराजाला आधाराची गरज.

मुंबई,

 

राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे अपार नुकसान केले आहे. राज्यातील जवळपास एक लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याची आजची स्थिती पाहता नियम अटी, पंचनामे या प्रशासकीय कामात वेळ न घालवता तातडीने मदत देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता कोरडवाहू शेतीसाठी एकरी २५ हजार रुपये व बागायती शेतीच्या नुकसानीपोटी एकरी ५० हजार रुपयांची मदत तात्काळ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे, या पत्रात ते पुढे असे म्हणातात की, बळीराजा हा सातत्याने संकटाच्या दुष्टचक्रात भरडला जात आहे. यावर्षी कमी पावसाचा मोठा फटका शेतीला बसला आहे, खरिप पुरता वाया गेला आणि आता रब्बी हंगामानेही घात केला आहे, शेतकऱ्याचे हे वर्षच नुकसानीचे ठरले आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतातील पिके वाया गेली आहेत. कापूस, तूर, सोयाबीन, कांदा, धान, सोयाबीन, द्राक्षे, आंबा, डाळींब, पपई, केळी, ऊस, संत्रा या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. राज्यातील १७ जिल्ह्यांतील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे तर इतर जिल्ह्यातही या अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसला आहे, विशेषतः विदर्भ, मराठवाडा, खान्देशात या अवकाळीचा मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यात गारपिटीने फळबागांचे मोठे नुकसान केले असून भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे.

शेतकरी जगला तरच आपण जगू, आपली अन्नधान्याची गरज भागवणारा बळीराजा नैसर्गामुळे हतबल झाला आहे. एकीकडे महागाई व दुसरीकडे नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याची नितांत गरज आहे. दुष्काळाचा सामना करत असताना आता अवकाळी व गागपिटीने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. सरकारने शेतकऱ्याला तात्काळ मदत करुन आधार दिला पाहिजे. पिकविमा कंपन्यांकडूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून द्यावी, असेही नाना पटोले म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button