बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

आरक्षण संपुष्टात आणणारा भाजप कोणालाही आरक्षण देणार नाही :- नाना पटोले

आरक्षणप्रश्नी फडणवीसांची मराठा व ओबीसी समाजाशी वेगवेगळी विधाने.

आरक्षण प्रश्नावर कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये.

मुंबई,

दि. १९ ऑक्टोबर

आरक्षण प्रश्नावर भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस मराठा व ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहेत. फडणवीस ओबीसी समाजासमोर एक भुमिका मांडतात तर मराठा समाजाबद्दल दुसरी भूमिका मांडतात. आरक्षणाचा प्रश्न फक्त काँग्रेस पक्षच मार्गी लावू शकतो, भारतीय जनता पक्षाला मात्र कोणालाही आरक्षण द्यायचे नाही, आरक्षण संपुष्टात आणणे हीच त्यांची भूमिका आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, आरक्षण प्रश्नावरून जालना जिल्ह्यातील एका मराठा तरुणाने मुंबईत आत्महत्या केली ही अत्यंत दुःखद घटना आहे. आरक्षण प्रश्नावर कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचले नये. भारतीय जनता पक्ष २०१४ साली खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेला आहे. जनतेची दिशाभूल करण्याचे काम भाजपा करत असते, त्यांच्या भूलथापांना जनतेने बळ पडू नये. “देवेंद्र फडणवीस सरकारने सांगितल्याप्रमाणे २०१९ च्या सुनावणीत आपण न्यायालयात बाजू मांडली नाही”, असे फडणवीस सरकारच्या वेळचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनीच जाहीरपणे सांगितलेले आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असतानाही आरक्षण न देता केवळ पोकळ आश्वासने दिली जात आहेत. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागायचा असेल तर ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी लागेल आणि त्याचा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागतो. जातनिहाय जनगणना केल्यास आरक्षणाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल म्हणून काँग्रेस पक्ष जातनिहाय जनगणना करण्याची आग्रही मागणी करत आहे.

राज्यात ड्रग्जच्या प्रश्नावर काँग्रेस पक्षाने आधी आवाज उठवला होता, त्यावेळी सरकार झोपलेले होते. ललित पाटील या ड्रग माफियाला अटक केल्यानंतर आता सरकारला जाग आली आहे. फडणवीस आता बोलत आहेत पण गृहखाते तुमच्याकडे आहे, सरकार तुमचे आहे मग चौकशी का करत नाही? ड्रग प्रकरणी काँग्रेसने नाशिकमध्ये आंदोलन करुन महाराष्ट्रातून ड्रग्जचा धंदा करणाऱ्यांची पाळमुळं नष्ट करा, अशी मागणी केली होती. ललित पाटील या प्रकरणातील प्यादे आहे, खरे मास्टरमाईंड कोण आहेत हे समोर येण्यासाठी सरकारने चौकशी करावी, असेही नाना पटोले म्हणाले.

जागा वाटपाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीत अजून चर्चा झालेली नाही. मविआमध्ये कसलाही वाद नाही मात्र महायुतीतच जागा वाटपावरून वादावादी सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना लोकसभेच्या १७-१८ जागा मागत आहे, ते आधी पहा. सध्या पाच राज्यातील विधानसभेवर काँग्रेस पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे, योग्यवेळी महाविकास आघाडी जागा वाटपावर चर्चा करेल, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button