बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

अकोला येथील अतिविशेषोपचार रुग्णालयासाठी आवश्यक पदभरती प्रक्रिया दोन महिन्यात करणार

– वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 

मुंबई,

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (PMSSY-III) अंतर्गत अकोला, यवतमाळ, लातूर व औरंगाबाद येथे अतिविशेषोपचार रुग्णालय सुरु करण्याच्या अनुषंगाने 3 टप्यात वर्ग-1 ते वर्ग-4 संवर्गातील एकूण 1847 पदनिर्मितीपैकी प्रथम टप्प्याकरीता आवश्यक असलेल्या एकूण 888 पदांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये, अतिविशेषोपचार रुग्णालय, अकोला करीता प्रथम टप्प्यातील 223 पदांचा समावेश आहे. तेथील आवश्यक पदभरतीसंदर्भात दोन महिन्यांत कार्यवाही करण्यात येईल. ज्या पदांसाठी उमेदवार मिळत नाहीत. त्यासाठी अशा पात्र उमेदवारांना काही सोयीसुविधा देऊन याठिकाणी बोलावता येईल का याचा समिती नेमून अभ्यास केला जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली.

सदस्य रणजित सावरकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. मुश्रीफ यांनी उत्तर दिले.

ते म्हणाले की, वर्ग 1 आणि वर्ग 2 चे पद भरतीचे अधिकार राज्य लोकसेवा आयोगाला आहेत, तर वर्ग 3 ची पदभरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही पदे सप्टेंबरपर्यंत भरली जातील. तसेच दोन महिन्यांत अकोला येथील सर्व पदे भरण्यात येतील. वर्ग 4 ची पदे भरण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती करते. ही प्रक्रिया तातडीने करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात येतील.

अतिविशेषोपचार विषयातील अध्यापकांची अपूर्ण पदे पाहता, विद्यार्थी हित विचारात घेवून, करार तत्वावर प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक नियुक्त करण्याचे अधिकार आयुक्त (वैद्यकीय शिक्षण) व तात्पुरत्या स्वरुपात सहायक प्राध्यापक नियुक्त करण्याचे अधिकार संबंधित अधिष्ठाता यांना देण्यात आले असल्याची माहितीही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी दिली.

सदस्य रोहित पवार यांनीही यावेळी चर्चेत भाग घेतला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button