बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

आयुक्त अभिजीत बांगर यांनी साधला ठामपा शाळांमधील दहावीच्या ‘टॉपर्स’सोबत मनमोकळा संवाद

विजय कुमार यादव

ठाणे (23) –

दहावीनंतर पुढे काय करणार.. कोणत्या शाखेत प्रवेश घेणार.., पुढे कोणत्या क्षेत्रात करियर करायला आवडेल या सोबतच भविष्यात काय व्हायला आवडेल अशा या आयुक्तांनी विचारलेल्या प्रश्नांना इंजिनीयर.., डॉक्टर.., प्रोफेसर.. पोलीस तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणार अशी उत्तरे देत विद्यार्थ्यांनी देखील महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचेसोबत मनमोकळा संवाद साधला, निमित्त होते ठाणे महापालिका शाळांतील दहावीत सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळयाचे..

ठाणे महापालिका शाळांमधील सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच महापालिकेतील कै. अरविंद पेंडसे सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या कु.सुफयान अन्सारी (91 टक्के- शाळा क्र. 11, मुंब्रा), कु.सॉलेहा शेख (90.60 टक्के, शाळा क्र. 11 मुंब्रा), कु. प्राची गायकवाड (88.60 टक्के, शाळा क्र. 07 मानपाडा), कु. समिक्षा वाजे (88.40 टक्के, शाळा क्र. 15 किसननगर), कु. बुशरा खातून शेख (88.00 टक्के शाळा क्र. 13, कौसा) या विद्यार्थ्यांचा गौरव आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला.

साधारणत: आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी ठामपा शाळेत शिक्षण घेत असतात. शालेय जीवनानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या करिअरची दिशा ठरणार असते, अशा वेळी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होणे गरजेचे आहे या हेतूने या विद्यार्थ्यांशी आयुक्‌तांनी संवाद साधला.

शाळेबद्दल काय वाटते, शाळेबद्दलचा अनुभव कसा होता? या आयुक्तांनी विचारलेल्या प्रश्नाला शाळा आवडते, शाळेतील सर्वच विषयांचे शिक्षक अभ्यासाच्या बाबतीत शंकाचे निरसन करत होते. अगदी परीक्षेच्या दिवशी सुद्धा सकाळी शिक्षकांनी व्ह‍िडीओ कॉलच्या माध्यमातून अडलेले गणित समजावून सांगितले. त्यामुळे शाळेचे शिक्षक हे कायमच पाठीशी राहिले, शाळा क्र. 15 मध्ये विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिक्षकांनी शिकविले असल्याचे समिक्षा वाजे हिने सांगितले. तर शाळेत कोणत्याही गोष्टी न आवडणाऱ्या नव्हत्या त्यामुळे शाळा आवडत असल्याचे प्राची गायकवाड हिने सांगितले.

तर उर्दु शाळेतून दहावी उत्तीर्ण झालेल्या बुशरा शेख, सॉलेहा शेख व सुफयान अन्सारी यांनी देखील शाळेतील अनुभव सांगितले. उर्दु शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्याचे त्यांनी आयुक्तांना सांगितले. ऑनलाईन अभ्‌यास करता का? कसा करता? या प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी मोबाईलवर करतो असे उत्तर दिले. मग मोबाईल कोणाचा वापरता ? बाबांचा, आईचा मोबाईल वापरता असे उत्तर विद्यार्थ्यानी देताच मोबाईलवर काय पाहता असा प्रश्न त्यांना आयुक्तांनी विचारला असता यूट्यूबवर अभ्यासाशी संबंधित गोष्टी, तसेच सिनेमा पाहत असल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले. मनमोकळेपणाने रंगलेल्या या गप्पांमध्ये गुगलचा वापर करता का? आदी तंत्रज्ञानाबाबत आयुक्तांनी चर्चा केली. तसेच शास्त्रज्ञांबद्दल माहिती विचारताच माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची पुस्तके वाचल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले. यावेळी आयुक्तांनी पालकांशी संवाद साधला असता, मुले स्वत:च्या पायावर उभी रहावी यासाठी मुलांना शिकवण्यासाठी सर्व सहकार्य करणार असे पालकांनी असल्याचे सांगितले.

विद्यार्थ्यांनी व्यक्त केला लॅपटॉप मिळाल्याचा आनंद

मुलांच्या कौतुकाबरोबरच मुलांच्या पालकांना पुष्पगुच्छ देवून त्यांचा सन्मान करण्यात आला, तर मुलांना पुस्तके, पेन व लॅपटॉप देण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना केवळ संधीचा अभाव असल्यामुळे आपल्या कर्तृत्वाला साजेसे यश मिळवता येत नाही. गुणवंताच्या बाबत अशी बाब घडू नये यासाठी मनपा शाळेतील पाच गुणवंत विद्यार्थ्यांना सीएसआरच्या माध्यमातून लॅपटॉप देण्याचा निर्णय आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला व त्याची यावर्षीपासून सुरूवात झाली. या लॅपटॉपचा वापर कसा करणार? लॅपटॉपच्या माध्यमातून भविष्यातील कशी मदत होईल यावर सुद्धा मुलांनी मोकळेपणाने उत्तरे दिली व लॅपटॉप मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

शाळांमध्ये वाचनाचा तास ठेवावा.

पुस्तके वाचायला आवडतात का? मग कोणती पुस्तके वाचायला आवडतात, पुस्तके कुठे मिळतात, आपण राहत असलेल्या ठिकाणी लायब्ररी आहे का? शाळेतील पुस्तके आपल्याला दिली जात होती का? या सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यानी दिली. एकंदर मुलांना वाचनाची आवड असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांची आवडती पुस्तके कुठली? याचीही माहिती मुलांनी दिली. एवढेच नाही तर या सत्कार सोहळयात मुलांना जी पुस्तके दिली त्यापैकी ‘ॲटोमिक हॅबिट’ हे जगविख्यात पुस्तकही वाचण्याची माझी इचछा होती व ते मला घ्यायचे होते असे समीक्षा वाझे या विद्यार्थीनीनी नमूद केले. आज हे पुस्तक मला मिळाले याबाबत तिने आनंद व्यक्त केला. सानेगुरुजी यांचे ‘श्यामची आई’, पु.ल. देशपांडे यांचे ‘बटाटयाची चाळ’ ही पुस्तके वाचली असल्याचे सांगितले. मुलांना वाचनाची आवड लागावी यासाठी शाळांमध्ये वाचनांचा एकतास ठेवणे गरजेचे आहे. किमान रोज एक तास जरी मुलांनी विविध पुस्तके वाचली तर त्यांना आपोआपच सवय लागून आवड निर्माण होईल यासाठी प्रत्येक शाळेत वाचनालय करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असेही आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले.

सर्व शाळांमध्ये संगणक असावेत.

संगणकाबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या दृष्टीने ठामपाच्या सर्व शाळांमध्ये संगणक उपलब्ध होतील या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी शिक्षणाधिकारी यांना दिल्या. तसेच एका वर्गामध्ये किती मुले असावीत याबाबत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा मूलभुत कायद्यानुसार मर्यादा पाळली जावीत तसेच नववी, दहावी या माध्यमिक इयत्तांमध्ये सुद्धा प्रत्येक वर्गात मर्यादित संख्या राहिल हे सुनिश्चित करावे, जेणेकरुन शिक्षणाचा चांगला दर्जा राखता येईल.

इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढविणे गरजेचे

दहावीच्या इयत्तेत 88.40 टक्के गुण प्राप्त करणारी समिक्षा वाझे ही शाळा क्र. 15 इंग्रजी माध्यमाची विद्यार्थींनी असून या शाळेत शिक्षण घेताना चांगला अनुभव आला. मराठी माध्यमांच्या शाळांचा दर्जा वाढविण्याबरोबरच इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढणेही तेवढेच गरजेचे असल्याचे आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनीही विद्यार्थ्यांनी मेहनत घेवून चांगले गुण प्राप्त केले याचा ठाणे महापालिकेला निश्चितच अभिमान असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, बँक ऑफ महाराष्ट्रचे उपमहाप्रबंधक राजकिशोर रणजीत तसेच शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button