बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” सुरू

आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आमचे ध्येय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र दिनी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचा विस्तार, गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा

 

मुंबई,

‘आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. सर्व सामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे आपला प्रयत्न आहे. त्यादिशेने आपला आरोग्य विभाग काम करत आहे, याचे समाधान आहे,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा आज मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत विस्तार करण्यात आला. या योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजीटल अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ‘सामान्य माणसांचा विचार करून लोकाभिमुख, लोकोपयोगी निर्णय घेण्यात सरकार प्रयत्नशील असून, त्यामध्ये आपला दवाखाना ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” योजना सुरू करण्यात आली. यातून आता गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. यात सुमारे ३० चाचण्या मोफत करण्यात येतील.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस नागपूर येथून, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत उस्मानाबाद येथून तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आदी त्या-त्या जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणांहून लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आदी मान्यवरांसमवेत दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले. वर्षा शासकीय निवासस्थानी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आपल्याला कोरोनाने आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणाचा धडा दिला आहे. छोट्या छोट्या आजारांवरील उपचारासाठी मोठ्या रुग्णांलयांचा ताण कमी करावा लागेल. या उद्देशाने आणि गरजूंना घराजवळ उपचाराची सुविधा मिळवून देण्याची गरज लक्षात घेऊन आपण ठाणे येथून या योजनेची सुरुवात केली होती. त्याची अंमलबजावणी मुंबईमध्ये सुरू केली आणि आता संपूर्ण राज्यात आपला दवाखाना सुरू होत आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार चालणारे हे सरकार आहे. त्यांनी देखील आरोग्य विषयाला प्राधान्य दिले होते. आज मुंबईमध्ये सुमारे २५० आपला दवाखाना कार्यरत आहेत. त्याचा लाभ लाखो रुग्णांना होत आहे. आता या योजनेमुळे ग्रामीण भागात सुलभ आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. आरोग्य विभागांतर्गत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे १५व्या वित्त आयोगाअंतर्गत स्थापित केली जाणार आहेत. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी आपण या सेवेच्या विस्ताराची घोषणा केली होती. त्यानंतर काही महिन्यांतच आरोग्य विभागाने त्यावर अंमलबजावणी करीत सामान्य नागरिकांना मोफत आरोग्यसेवेसाठी हे दवाखाने उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी आरोग्य विभाग कौतुकास पात्र आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button