बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त

विधान भवन येथे ध्वजारोहण

मुंबई,

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे व विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे सनई-चौघडा व तुतारीच्या निनादात पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. विधान भवनाचा आसमंत सनई-चौघडा व तुतारीच्या निनादाने मांगल्य आणि उत्साहाने बहरून गेला होता. यावेळी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी झालेल्या जनआंदोलनातील सर्व नेत्यांच्या त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून या जनआंदोलनात हौतात्म्य पत्करावे लागलेल्या सर्वांच्या पवित्र स्मृतीस अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी अभिवादन केले. महाराष्ट्र हे देशपातळीवर एक अग्रगण्य राज्य असून हा लौकिक यापुढेही कायम रहावा यासाठी सर्वांनी कार्यतत्पर रहावे असे आवाहन करून त्यांनी राज्यातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

ध्वजारोहण सोहळ्यास महाराष्ट्र विधानमंडळाचे सह सचिव विलास आठवले, उपसचिव ऋतुराज कुडतरकर, उपसचिव (विधी) श्रीमती सायली कांबळी, उपसचिव सुभाष नलावडे, सहसचिव महेंद्र काज, अवर सचिव मोहन काकड, सुरेश मोगल, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह विधानमंडळाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदिप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.

या समारंभानंतर महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील सुरक्षा विभागाचे सुरक्षा सहायक हणमंत शंकर शिंदे यांनी महाराष्ट्र पोलीस दलात त्यांचे 34 वर्षे सेवाकालावधीत केलेल्या उल्लेखनीय व प्रशंसनीय कामगीरीबद्दल, महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांचे घोषित झालेले सन्मानचिन्ह अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते त्यांना प्रदान करुन यावेळी सन्मानित करण्यात आले. सुरक्षा विभागातील एकूण 11 वरिष्ठ सुरक्षा अधिकारी व सुरक्षा सहायक यांनी सन 2022-23 या कालावधीत विधान भवन, मुंबई येथे केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा आणि मा.उपसभापती, विधानपरिषद, मा.विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्र विधानपरिषद यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button