छत्रपतींच्या नावानेच शाळा आणि क्रिकेटची सुरुवात
भारतरत्न सचिन तेंडुलकर
मुंबई,
शाळेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धड्याने आणि माझ्या क्रिकेटची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज मैदानात झाली, अशा शब्दांत भारतरत्न सचिन तेंडुलकर याने आज भावना व्यक्त केल्या.
दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी “जाणता राजा” या महानाट्याचे प्रयोग आयोजित केले असून पहिल्या प्रयोगा पासूनच हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळतो आहे.
रोज या प्रयोगाची सुरुवात तुळजाभवानीच्या आरतीने होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहिली आरती करुन प्रयोगांच्या मालिकेला सुरुवात झाली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गायिका उषा मंगेशकर आदींनी हजेरी लावली. तर आज भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी आरती करुन प्रयोगाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजंन करणाऱ्या आमदार अँड आशिष शेलार यांनी सचिन तेंडुलकर यांचे स्वागत केले आणि याच मैदानावरुन सुरुवात करुन आपण क्रिकेटचे मैदान गाजवलेत आज पुन्हा एकदा भाषणाने मैदान गाजवा, असे आवाहन करीत सचिन तेंडुलकर यांंचे आभार मानले.
आजच्या पाचव्या प्रयोगाला कँबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेते अंकुश चौधरी, अभिनेत्री सना शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.