महाविकास आघाडीच्या पैकीच्यापैकी जागा निवडून येतील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांविषयी लोकांच्या मनात प्रचंड नाराजी आणि महाविकास आघाडीमध्ये एकजुटता आहे.
सांगली:- महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांविषयी लोकांच्या मनात प्रचंड नाराजी आणि महाविकास आघाडीमध्ये एकजुटता आहे. आघाडी एकसंघपणे लढली तर चित्र पलटू शकते आणि महाविकास आघाडीच्या पैकीच्यापैकी जागा निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
आज सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. पै. चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ तासगाव येथे जाहीर सभेला जयंत पाटील संबोधित करत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, तासगावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आ. सुमनताई पाटील वहिनी या सातत्याने येथील पाण्याचा प्रश्न मांडत आहेत. मी जलसंपदा मंत्री असताना टेंभू योजनेतून या भागात आठ टीएमसी अतिरिक्त पाणी देण्याचा निर्णय घेतला. नदीत पाणीच नाही अशी बतावणी करणारी हुशार लोकं युती सरकारमध्ये होती. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात बराच अभ्यास करून योग्य नियोजन केले. जतच्या उर्वरित भागासाठी सहा टीएमसी पाणी देऊन जत विस्तारित योजनेचे काम सुरू केले. जवळपास १२० गावांना या नियोजनाचा फायदा होणार आहे असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला मिळणारा प्रतिसाद पाहता पुढच्या विधानसभा निवडणुकीत आपले सरकार येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच सरकार आल्यानंतर टेंभू योजनेतील उर्वरित सर्व कामे एका वर्षाच्या आत पूर्ण करू असेही त्यांनी आश्वासन दिले.