नरेंद्र मोदीच खरा भटकता आत्मा, १० वर्ष केवळ जगभर भटंकती; मोदी प्रधानमंत्री कमी आणि प्रचारमंत्रीच जास्त: : नाना पटोले
काँग्रेसच्या जाहिरनाम्यात कोणत्याही धर्माचा उल्लेख नाही; मोदींनी जाहिरनामा नीट वाचावा, अपप्रचार करु नये काँग्रेसच्या जाहिरनाम्यात कोणत्याही धर्माचा उल्लेख नाही; मोदींनी जाहिरनामा नीट वाचावा, अपप्रचार करु नये
काँग्रेसच्या जाहिरनाम्यात धर्माचा उल्लेख कुठेही केलेला नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने काँग्रेसबद्दल अपप्रचार करत आहेत. काँग्रेस मंगळसूत्र व स्त्रीधन हिसकावून घेऊन मुस्लीमांना देणार अशी विधाने पंतप्रधानांना शोभत नाहीत. सातत्याने खोटे बोलत महाराष्ट्रभर फिरणारे नरेंद्र मोदीच खरे भटकते आत्मा आहेत. मोदींनी कोणती पदवी घेतली हे माहित नाही पण त्यांना जाहिरनामा वाचता येत नसेल तर काँग्रेस त्यांना समजवून सांगेल. काँग्रेसबद्दल सातत्याने खोटे बोलून नरेंद्र मोदींनी जनतेची दिशाभूल करून संभ्रम निर्माण करु नये, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानांचा समाचार घेत नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसने जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले आहे, तसेच सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सर्वे करणार असल्याचे म्हटले आहे. याआधीही एससी, एसटी समाजाचे आर्थिक, सामाजिक सर्वे करण्यात आले आहेत, त्यावेळी मंगलसुत्र, स्त्रीधन हिरावून घेण्याचा प्रश्न उपस्थित झाला नाही आताच का झाला. संपत्ती करावरूनही मोदी जनतेना चुकीची माहिती देत आहेत. संपत्ती कराबद्दल वाजपेयी सरकारने चर्चा केली होती आणि मोदी यांचे अर्थमंत्री अरुण जेटली, जयंत सिन्हा आणि निर्मला सितारामन यांनीच संपत्ती कर आणण्याचे सुतोवाच केले होते. १० वर्षात सत्तेत असताना मोदींनी काय केले ते सांगावे, देशाची संपत्ती विकून देश चालवला, रुपयाची घसरण झाली तो प्रति डॉलर ९० रुपयांवर गेला. शेतकऱ्यांना फसवले, महागाई, बेरोजगारी वाढवली त्याबद्दल नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत फक्त धार्मिक मुद्द्यावर बोलून समाजात तेढ निर्माण करत आहेत.
महाराष्ट्रात एक भटकती आत्मा आहे या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाचा समाचार घेताना नाना पटोले म्हणाले की, भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच आहेत, त्यांना चैनच पडत नाही, १० वर्ष ते फक्त प्रचारच करत आहेत. दिवसभर सारखे कपडे बदलून फोटोसेशन करणे, कधी समुद्राच्या खाली तर कधी हवेत. असा पंतप्रधान देशाने याआधी पाहिला नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर नाहक टीका करून वेळ वाया घालवू नये. काँग्रेसने देश टिकवला, सांभाळला म्हणून शिंदे आज मुख्यमंत्री होऊ शकले पण मोदी सत्तेत आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धोरणे बदलली, जीएसटी लावून जनतेला लुटले व मित्रांचे खिशे भरले. काँग्रेसने शेवटच्या माणसाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले आणि भाजपा तर या घटकला पुन्हा विकासाच्या बाहेर फेकत आहे. कांदा निर्यातबंदी उठवलेली नाही, शेतकऱ्यांना मदत केली नाही, पिक विम्याचे पैसे मिळत नाहीत त्यावर सरकारने बोलले पाहिजे. पुण्यात एमपीएससीच्या मुलांना भेडसावणाऱ्या समस्यांवर लक्ष घातले पाहिजे. राज्यात पाणी नाही, दुष्काळ पडला आहे त्याकडे मुख्यमंत्री व सरकारने लक्ष देण्याची गरज असताना खोके-बोके सरकार एकत्र येऊन सत्तेची मलई खाण्यात व्यस्त आहे.
देवेंद्र फडणवीसांनी कोणताही शाप दिला तरी तो लागत नाही, त्यामुळे सत्यानाथ होईल या त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. धनगर, आदिवासी, मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मोठ्या घोषणा केल्या होत्या त्याचे काय झाले त्यावर बोला, राज्यातील उद्योग गुजरातला पाठवले त्यावर बोला. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना काळीमा फासणाऱ्या फडणवीस यांना शाप देण्याचा कोणताही अधिकार नाही, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.