महाराष्ट्रमुंबई

मुक्ताईनगर ते रावेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

शासन आपल्या दारी’ हा लोकाभिमुख उपक्रम; चार कोटी लोकांना मिळाला लाभ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्ताईनगर पर्यटन विकासासाठी पन्नास कोटी देणार

 

महाराष्ट्र शासनाचा ” शासन आपल्या दारी हा उपक्रम लोकाभिमुख ठरला असून त्यातून चार कोटी लोकांना विविध लाभ मिळाले. सरकारने लेक लाडकी योजना, एस. टी. बसमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिली. शेतकऱ्यांना मदत करतांना एन.डी.आर.एफ नियमात बदल केल्याचे सांगून आता मुक्ताईनगर आणि रावेरला जोडणारा इथली भाग्य रेषा बदलणारा हा तापी नदीवरला पूल देत आहोत. तसेच संत मुक्ताईच्या पावनभूमीच्या पर्यटन विकासासाठी पन्नास कोटी रुपये देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुक्ताईनगर तालुक्यातील मुंढोळदे (खडकाचे) व रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील पुलाच्या भूमीपूजनानंतर झालेल्या जाहिर कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आ. किशोरआप्पा पाटील, आ. संजय सावकारे, आ. चिमणराव पाटील, आ.चंद्रकांत पाटील, माजी आ. चंद्रकांत सोनवणे, माजी आ. दशरथ भांडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित उपस्थित होते.

मुक्ताईनगरच्या या पुलामुळे 30 ते 35 किलोमीटरचा वळसा वाचणार असून आता मुक्ताईनगर आणि रावेर जोडले जाणार आहे. हा पुल नाबार्ड कडून केला जाणार असल्याचे सांगून या पुलासाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात सगळीकडे विकासाची कामं सुरु आहेत. शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख उपक्रम राबविला जातो आहे. एका छताखाली सगळ्या गोष्टी मिळतायत, कोणाला ट्रॅक्टर मिळतय,कोणाला घर मिळतंय, कोणाला शेती अवजारे मिळतायत अशा अनेक योजनाचा थेट लाभ दिला जात आहे. उद्योगाच्या बाबतीतही शासनाने आघाडी घेतली असून पाच हजार कोटीचे नवे उद्योग राज्यात येत आहेत. त्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे.

संत मुक्ताबाई यांच्या पावन भूमीच्या विकासासाठी पन्नास कोटी रुपये देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तालुक्यातील इतर विकासकामाचे जवळपास 75 कोटी रुपयांच्या कामाचे आज मुख्यमंत्री यांनी उदघाटन केल्याचे जाहीर केले.

मंत्री अनिल पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, मुक्ताईनगर ते रावेरचे प्रवेशद्वार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वाद आणि मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाचे यश असून आता मुक्ताईनगर बदलायला लागलं आहे.

यावेळी आ. चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री यांची कृतज्ञता व्यक्त केली. तापी नदीवरील हा पुल इथल्या जनतेसाठी किती महत्वाचा होता हे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button