बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल

छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ स्पर्धाचे राज्यातील सर्व जिल्ह्यात आयोजन होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

३ लाख खेळाडूंच्या नोंदणीसह मुंबई शहर आणि उपनगरात स्पर्धेला जल्लोषात सुरुवात

मुंबई, दि २६ जानेवारी-

शिवकालीन खेळांचा वारसा, आपली संस्कृती जपण्यासाठी कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी या स्पर्धेचा शुभारंभ राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जांबोरी मैदान, वरळी येथे झाला.

पारंपारिक मैदानी खेळाला पुनर्जीवित करून त्याला उजाळा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.

मुख्यमंत्री म्हणाले “मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून एक आगळावेगळा उपक्रम आपण सुरू केला आहे. साहस दाखवण्यासाठी खेळाडूंना प्राधान्य दिले पाहिजे. त्यांना पुढे येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष राज्यभर साजरे केले जात असताना, या क्रीडा महाकुंभाच्या माध्यमातून एक वेगळीच जोड मिळाली हे कौतुकास्पद आहे. येथे राज्यातील गड किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी व त्याविषयी माहिती होण्यासाठी गड किल्ल्याचे प्रदर्शन भरवले जात आहे. ही खरी छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आहे.”

प्रसंगी बोलतांना मंत्री लोढा म्हणाले, “या स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ही बाब अतिशय समाधानकारक आहे. ३ लाख खेळाडूंचा सहभाग घेऊन ही स्पर्धा अतिशय जल्लोषात संपन्न होईल हा विश्वास आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर स्पर्धा राज्यभर आयोजित करण्याची केलेली घोषणा ही आमच्या सर्वांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप आहे. आता या स्पर्धेच्या माध्यमातून हॉकी, क्रिकेट या खेळांच्या जोडीला पुन्हा एकदा आपले देशी खेळ सुद्धा येतील. आपल्या तरुण पिढीला त्यांची ओळख होईल, त्यात त्यांचे स्वारस्य वाढेल आणि शिवकालीन खेळांची, आपल्या संस्कृतीची पताका उंच फडकत राहील.”

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सदर स्पर्धेचे आयोजन केले जात असून, स्पर्धेचे पावित्र्य जपण्यासाठी रायगडावरून शिवज्योतिचे मुंबईमध्ये आगमन झाले. याच शिज्योतीच्या साक्षीने स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.

या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ती येथे आयोजित केली गेलेली प्रदर्शने आणि प्रात्यक्षिके. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ११ दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन बघण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. तसेच शिवकालीन खेळ स्पर्धेच्या अनुषंगाने उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्रातील २७ किल्ल्यांचे प्रदर्शन देखील उभारले गेले होते. गडकिल्ल्यांची सुबक आणि हुबेहूब प्रतिकृती पाहण्यासाठी तसेच त्यांची माहिती ऐकण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. लोकांचा प्रतिसाद बघून सदर प्रदर्शन पुढील ३ दिवस सुरु राहील अशी घोषणा मंत्री लोढा यांनी केली. त्याचबरोबर येथे आरमार प्रदर्शन सुद्धा भरवण्यात आले होते. उद्घाटनादरम्यान झालेली युद्धकलांची, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button