महाराष्ट्रातील शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी करून नवीन कर्ज द्यावे, खासदार सुप्रियाताई सुळेंची लोकसभेत मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रियाताई सुळे
नवी दिल्ली
महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी लोकसभेत केली आहे. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी सुप्रियाताई सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या आहेत. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून त्यांना केंद्राने तत्काळ मदत करण्याची गरज आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असून, जुने कर्ज माफ करून नवीन कर्ज देण्याची मागणी सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज दि. ४ पासून सुरुवात झाली. ४ ते २२ डिसेंबर या १९ दिवसांच्या कामकाजामध्ये १५ बैठका होणार आहेत. या अधिवेशनात देशातील गेल्या काही महिन्यांमधील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण, अतिवृष्टी, दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, शेतकर्यांची कर्जमाफी यांसारख्या अनेक समस्या महाराष्ट्राला भेडसावत आहेत. ज्यामुळे या मुद्द्यांवर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा केली जाणे, याबाबतचे मुद्दे अधिवेशनात मांडले जाऊन त्याच्यावर योग्य तोडगा निघणे अत्यंत गरजेचे आहे. यांतील शेतकर्यांची कर्जमाफी हा राज्यातील ज्वलंत प्रश्न असून हा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी संसदेत मांडला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुप्रियाताई सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या. तर राज्यातील शेतकर्यांना आर्थिक मदतीची गरज असून, जुने कर्ज माफ करून नवीन कर्ज देण्याची मागणी सुप्रियाताई सुळे यांच्याकडून करण्यात आली आहे.
लोकसभेत शेतकर्यांच्या प्रश्नांबाबत बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्र आणि माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. काही जिल्ह्यात गारांचा पाऊस झाल्याने ओला दुष्काळ पाहायला मिळत आहे, तर काही ठिकाणी यंदा पाऊसच झाला नाही. त्यामुळे अशाठिकाणी कोरडा दुष्काळ पडला आहे. वातावरण बदलामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. द्राक्ष, कांदा, केळी, गहू, धान, कापूस, सोयाबीनसह पाल्याभाज्यांचे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकर्यांची चिंता वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्रामधील नाशिक, बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी देखील अडचणीत आला आहे.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, राज्यात कुठे ओला दुष्काळ, तर कोठे कोरडा दुष्काळ असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे दुधाला भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी संकटात आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाने तत्काळ महाराष्ट्रात जाऊन पाहणी करावी. तसेच महाराष्ट्राला केंद्राने मदत करावी. तसेच कष्ट करणार्या महाराष्ट्रातील शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी. तसेच त्यांना नवीन कर्ज देखील देण्यात यावे, अशी थेट मागणी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केली आहे. तर, महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे बँकेतून त्यांना कर्ज दिले पाहिजे. सोबतच हवामान बदलाचा देखील त्यांना फटका बसत असून, यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. आपल्यावर जेव्हा संकट येते त्यावेळी शेतकरी मदतीला धावून येत असतो. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकर्यांचे कर्ज माफ करण्यात येवून त्यांना नवीन कर्ज देण्यात यावे, अशी सुप्रियाताई सुळे यांनी मागणी केली आहे.