2 वर्षांपासून लटकलेल्या नित्यानंद संस्थान विश्वस्त निवडीची माहिती देण्यास ठाणे न्यायालयाचा नकार
गणेशपुरी येथील श्री भीमेश्वर सद्गुरू नित्यानंद संस्थानावर मागील 2 वर्षपासून विश्वस्तपदाची निवड लटकलेली आहे. निवड प्रक्रिया ज्या ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून सुरु आहे त्याकडून आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास सपशेल नकार देण्यात आला आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी 9 ऑक्टोबर 2023 रोजी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाकडे अर्ज केला होता. अनिल गलगली यांनी श्री भीमेश्वर सद्गुरू नित्यानंद संस्थानावर विश्वस्त नेमणूक प्रक्रियेची नस्ती ज्या स्तरावर प्रलंबित आहे आणि सक्षम प्राधिका-याची त्याची माहिती मागितली होती. तसेच जाहिराती नंतर प्राप्त अर्ज आणि नेमणुका बाबत यादी मागितली होती. जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रबंधक प्र. ल. कंठे यांनी अनिल गलगली यांस माहिती देण्यास नकार देत स्पष्ट केले की केंद्र सरकारच्या परिपत्रकानुसार जन माहिती अधिकारी यांनी माहिती शोधून, गोळा करुन, तयार करुन अर्जदारास देण्यातून सूट देण्यात आली आहे. प्रत्यक्षात अनिल गलगली यांनी कोणतीही माहिती शोधून, तयार करून किंवा गोळा करुन मागितली नसतानाही जन माहिती अधिकारी यांनी चुकीचा अर्थ काढला आहे.
गणेशपुरी येथे स्वामी नित्यानंद महाराजांच्या समाधी मंदिर प्रशासनाचा कारभार श्री भीमेश्वर सद्गुरू नित्यानंद संस्थानमार्फत चालवला जातो. या संस्थेवर अकरा विश्वस्त कार्यरत असतात. या विश्वस्त मंडळाची नेमणूक प्रक्रिया ठाणे जिल्हा सत्र न्यायालयामार्फत पाच वर्षांसाठी केली जाते. गेल्या विश्वस्त मंडळाची मुदत संपून दोन वर्षे झाले आहेत व त्याबाबत विश्वस्त निवडीसाठी 11 ऑक्टोबर 2021 रोजी जाहिरात काढून अर्जही मागवण्यात आले असून दोन वर्षे उलटूनही ही निवड प्रक्रिया लांबली आहे,असे सांगत अनिल गलगली म्हणाले की नेमणुका बाबत अक्षम्य दिरंगाई झाली आहे. यामुळे निर्णय घेण्यात अडचणी येत असून ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने तत्काळ कारवाई करण्याची माफक अपेक्षा भाविकांची आहे.