बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

संकल्प पूर्णत्वास येतोय याचा अभिमान : ना. सुधीर मुनगंटीवार

"आम्ही पुणेकर" सामाजिक संस्था आणि आरआर-41च्या जवानांचा पुढाकार

मुंबई :

जन्म देणाऱ्या मातेला आणि ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीला आपला अभिमान वाटावा असे कार्य जीवनात व्हावे असा माझा सातत्याने प्रयत्न असतो ; जम्मू काश्मीर मध्ये नियंत्रण रेषेजवळ कुपवाडा येथे आमचे आराध्य दैवत, आमचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी “आम्ही पुणेकर” या सामाजिक संस्थेला पूर्ण सहकार्य करुन महाराजांचा पुतळा कुपवाडा येथे उभारण्याचा केलेला संकल्प पूर्ण होत असल्याचा अभिमान असून राज्याचे कर्तव्यदक्ष, संवेदनशील मुख्यमंत्री ना. श्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते, जम्मू- कश्मीर चे उपराज्यपाल श्री. मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीत मंगळवारी, दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता हा अनावरण समारंभ संपन्न होणार आहे. अशी माहीती राज्याचे वने, सांस्कृतिक कार्ये व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

कुपवाडा येथे होत असलेल्या या कार्यक्रमात वीर पत्नींना सन्मानित करण्यात येणार असून वीर शहीद कर्नल संतोष महाडिक यांना अभिवादन करण्यात येईल. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय रायफल्स-41 चे जवान अतिशय उत्साहित असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटत आहेत. मागील आठवड्यात हा पुतळा जेव्हा या परिसरात दखल झाला तेव्हा जवानांनी ढोल ताशे आणि झांज वाजवून जल्लोषात स्वागत केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन महाराष्ट्राचे राज्यपाल मा.श्री. रमेश बैंस यांच्या हस्ते व मा. मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे, सांस्कृतिक कार्ये मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत दि. २० ऑक्टोबर रोजी राजभवन येथे झाल्यानंतर हा पुतळा कुपवाडाच्या दिशेने रवाना झाला होता.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार तसेच महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्यातून “आम्ही पुणेकर” या संस्थेतर्फे हा पुतळा उभारण्यात येत आहे. “आम्ही पुणेकर” संस्थेचे अध्यक्ष श्री हेमंत जाधव आणि विश्वस्त श्री अभयराज शिरोळे हे यांच्यासह त्यांच्या सदस्यांनी यासाठी परिश्रम घेतले आहेत.

कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत उभारण्यात येणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साडे दहा फुट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ x ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. या उपक्रमाला सर्वतोपरी सहाय्य केले जाईल असे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले होते.

कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमीपूजन भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्स च्या ४१ व्या बटालीयनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफीसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष श्री अभयराज शिरोळे यांच्या हस्ते दि. २० मार्च २०२३ रोजी पार पडले होते. नवीन तंत्रज्ञानाने बनविलेला छत्रपतींचा हा पुतळा जम्मू काश्मीर मधील प्रतिकूल हवामानात दिर्घकाळ तग धरेल असा बनवला गेला आहे. सदर संस्थेतर्फे कुपवाडा येथे भारतीय सैन्यासोबत विविध दीर्घकालीन उपक्रम प्रस्तावित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button