बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

काँग्रेस सत्तेत आल्यानंतर आरोग्य व शिक्षणाचा कायदा करू – नाना पटोले

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सरकारकडे पाठपुरावा करु.

पेटता महाराष्ट्र नको तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा.

मुंबई, दि. ३१ ऑक्टोबर

राज्यातील आरोग्य विभागात सावळा गोंधळ सुरु आहे, अपुरे कर्मचारी असल्याने त्याचा सार्वजिनक आरोग्य सेवेवर काय परिणाम होतो ते ठाणे, नाशिक, नांदेड व नागपूरमध्ये मागील महिन्यात झालेल्या घटनांवरून दिसले आहे. आरोग्य विभागात कर्मचारी व अधिकारी यांची हजारो पदे रिक्त आहेत पण सरकार या पदांची भरती करत नाही. आरोग्य विभाग व शिक्षण विभाग हे सर्वसामान्य जनतेसाठी महत्वाचे आहेत. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर शिक्षण व आरोग्याचा कायदा करु, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

आझाद मैदानावर राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी समायोजन कृती समितीचे हजारो लोक बेमुदत उपोषणाला बसले आहेत, काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर ते पुढे म्हणाले की, आरोग्य सेवा हे तुमचे व्रत आहे आणि प्रामाणिक सेवा करणाऱ्यांना उपाशी ठेवले जाते हे बरोबर नाही, उपाशी पोटी काम कसे करणार? या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करुन घेण्याचा प्रश्न प्रलंबित आहे, राज्य सरकारने आश्नासन देऊनही अद्याप त्याची पूर्तता केलेली नाही. आरोग्य विभागातील तुमच्या मागण्यांसाठी राज्य सरकारकडे काँग्रेस पाठपुरावा करेल, मुख्यमंत्री यांना त्यासंदर्भात पत्रही पाठवले जाईल आणि आगामी अधिवेशनातही हे प्रश्न मांडणार आहेत.


आरोग्य विभागातील प्रश्न गंभीर आहेत, शिक्षणाचा कायदा व आरोग्याचा कायदा आणला तर हे सर्व प्रश्न सुटतील. काँग्रेस पक्ष जाहिरनाम्यात याचा समावेश करेल व काँग्रेसचे सरकार आल्यानंतर त्यावर निर्णयही घेईल. आरोग्य विभाग व शिक्षण विभागाचे खाजगीकरण केले तर सर्वसामान्य गरिबांना शिक्षण व आरोग्यापासून दूर जावे लागेल.
राज्य सरकारने कंत्राटी भरती करणार नाही असे म्हटले आहे पण नोकर भरती कधी करणार याबद्दल सरकारने धोरण जाहीर केलेले नाही ते जाहीर करावे. वयोमर्यादा हा सर्वांचा मुख्य प्रश्न आहे, त्यामुळे वेळेवर पद भऱती केली नाही तर हजारो पात्र उमेदवारांना भरतीपासून वंचित रहावे लागेल. सरकारने आरोग्य विभागातील या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाहीतर काँग्रेस पक्ष हा प्रश्न धसास लावेल असे पटोले म्हणाले.

भाजपा सरकारमध्ये शेतकरी, कर्मचारी, तरुण कोणीच सुखी नाही. महागाईचा भस्मासूर आहे तर दुसरीकडे अपुरा पगार. कमी पगारात घरे चालवणे कठीण आहे. महाराष्ट्रातील आजची परिस्थिती गंभीर आहे, असा महाराष्ट्र कधीच नव्हता. आम्हाला असा पेटता महाराष्ट्र नको आहे, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा, असे नाना पटोले म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button