मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे विजेच्या बाबतीत राज्य पुन्हा प्रगतीपथावर
भाजपा प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांचे प्रतिपादन
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे विजेच्या बाबतीत गेल्या वर्षभरात सरकारी वीज कंपन्यांनी भरीव कामगिरी केली असून ऊर्जा क्षेत्रात राज्य पुन्हा प्रगतीपथावर आले आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सहमुख्य प्रवक्ते आणि महावितरण कंपनीचे स्वतंत्र संचालक मा. विश्वास पाठक यांनी केले. प्रदेश भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन, भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजविंदर तिवाना उपस्थित होते.
मा. विश्वास पाठक म्हणाले की, शेती, उद्योग, व्यापार, सेवा क्षेत्र, नागरी सुविधा अशा सर्व क्षेत्रात वीज ही अत्यावश्यक बाब बनलेली आहे. तथापि, महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कालावधीत राज्यावर लोडशेडिंगचे सावट आले होते, वीज क्षेत्रातील विकास प्रकल्प रखडले होते आणि सरकारी वीज कंपन्या आर्थिक संकटात आल्या होत्या. मा. देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा खात्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर निश्चित धोरणात्मक दिशा दिली, स्पष्ट उद्दीष्टे ठरवून दिली आणि ती गाठण्यासाठी आर्थिक व प्रशासकीय पाठबळ दिले. त्यांच्या नेतृत्वामुळे गेल्या वर्षभरात महावितरण, महानिर्मिती, महापारेषण आणि महाऊर्जा या सरकारी वीज कंपन्यांची गाडी पुन्हा रुळावर आली असून राज्याच्या आर्थिक विकासासाठी विजेची गरज पुरविण्यास या कंपन्या सज्ज होत आहेत.
त्यांनी सांगितले की, भाजपा शिवसेना युती सरकारच्या वर्षभराच्या कालावधीत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी सात हजार मेगावॅट विजेची सौरऊर्जेद्वारे निर्मिती करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत राज्यात किमान तीस टक्के कृषी फीडर सौर उर्जेवर चालविण्याचे मिशन २०२५ निश्चित केले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासोबतच उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी करण्याचा हेतू या योजनेमुळे साध्य होणार आहे. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या एक वर्षाच्या कालावधीत महानिर्मिती कंपनीने उच्चांकी वीजनिर्मिती केली. काळाची पावले ओळखून या कंपनीने रिन्यूएबल एनर्जीसाठी नव्या कंपनीला चालना दिली आहे. राज्याची विजेची वाढती गरज ध्यानात घेऊन महापारेषण कंपनी वीजवहनाच्या बाबतीत यशस्वी झाली. महापारेषणचे विजेचे टॉवर उभारताना शेतकऱ्यांना दिला जाणारा मोबदला ३० टक्क्यांनी वाढविण्यात आला.
त्यांनी सांगितले की, वर्षभरात महावितरण कंपनीच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली आणि राज्य लोडशेडिंगमुक्त ठेवण्यात कंपनीला यश आले. शेतकऱ्यांचा पेड पेंडिंगचा प्रश्न सोडविण्यासाठी आतापर्यंतची सर्वाधिक कृषी वीज कनेक्शन आणि ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीच्या बाबतीत भरीव कामगिरी ही या वर्षाची वैशिष्ट्ये आहेत. आगामी काळातील विजेची गरज ध्यानात घेऊन पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी आरडीएसएस ही योजना सुरू करण्यात आली. तसेच काळाची पावले ओळखून छतावरील वीजनिर्मिती आणि इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या बाबतीत कंपनीने लक्षणीय कामगिरी केली. मा. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आर्थिकदृष्ट्या मागास विभागातील उद्योगांना वीजदराबाबत मिळणारी सबसिडी तसेच वस्त्रोद्योग आणि यंत्रमागाच्या वीजदरातील सबसिडीबाबत गेल्या अडीच वर्षातील थकबाकी देण्यात आली.
ते म्हणाले की, महाऊर्जाने वीज क्षेत्रातील जागतिक प्रवाह ध्यानात घेऊन नविनीकरणीय ऊर्जा निर्मितीवर भर दिला. हायड्रोजन आणि सौर ऊर्जा या बाबतीत कंपनीने भक्कम पावले टाकली. पंप स्टोरेज प्रोजेक्टसाठी सुमारे ९६००० कोटी रुपये गुंतवणुकीचे करार आणि सौर तसेच पवन ऊर्जा निर्मितीसाठी हजारो कोटी रुपयांचे गुंतवणूक करार हे या वर्षाचे वैशिष्ट्य ठरले.