अतिवृष्टीच्या काळात सखल भागातील पाण्याचा निचरा जलद होईल या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात
– आयुक्त अभिजीत बांगर
शहरातील पाणी साचणाऱ्या सखल भागांची आयुक्तांनी केली पाहणी
नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे
विजय कुमार यादव
ठाणे (29) : पावसामुळे शहरातील ज्या सखल भागात पाणी साचते, अशा ठिकाणांची पाहणी आज महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली. अतिवृष्टीच्या काळात सखल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. सखल भागात साचत असलेले पाणी पंपाच्या साहाय्याने नाल्यात सोडण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच रस्त्यावरील पावसाळी गटाराची झाकणे उघडून वाहून आलेला कचरा तातडीने साफ करण्याचे निर्देश या पाहणीदरम्यान आयुक्तांनी दिले. बुधवारी (28 जून) झालेल्या व दिनांक 29 व 30 जून 2023 या दिवशी हवामान खात्यांनी दिलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याच्या दृष्टीने हा पाहणी दौरा करण्यात आला.
ठाणे शहरातील वंदना एस.टी. डेपो परिसर, जांभळीनाका येथील पेढ्या मारुती परिसर, भास्कर कॉलनी येथील चिखलवाडी, भांजेवाडी, ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे रेल्वेस्थानक परिसर आदी ठिकाणच्या सखल भागांची पाहणी आयुक्त श्री. बांगर यांनी केली.
वंदना एस.टी. डेपो परिसरात पावसात पाणी साचून हा परिसर जलमय होतो, या ठिकाणचे कलव्हर्ट वाढवून किंवा होल्डिंग पाँडच्या माध्यमातून पाण्याचा निचरा होवू शकेला का याची शक्यता पडताळून पहावी. तसेच या ठिकाणी या ठिकाणी पंप उपलब्ध केले असून सदर पंपाचे पाणी एस.टी डेपोच्या बाजूच्या नाल्यात न सोडता रस्ता क्रॉस करुन नाल्याच्या पुढील भागामध्ये सोडणे शक्य असेल तर तशी कार्यवाही करावी, जेणेकरुन वंदना चौकातील पाण्याचा फुगवटा वाढणार नाही. अतिवृष्टीच्या काळात सदर ठिकाणी महापालिका कर्मचारी ठेवण्याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच वंदना एस.टी. डेपो परिसरापासून ते गजानन महाराज मठापर्यत असलेल्या सर्व पावसाळी गटारांवरील जाळ्या काढून वाहून आलेला कचरा दैनंदिन साफ करण्याचे निर्देश स्वच्छता निरीक्षकांना आयुक्त श्री. बांगर यांनी दिले.
जांभळी नाका येथील पेढया मारुती परिसरातील पाण्याचा निचरा जलदगतीने व्हावा यासाठी या ठिकाणी खोल खड्डा करुन पंपाच्या सहाय्याने पाणी नाल्याच्या खालच्या भागात सोडण्याची कार्यवाही करावी, जेणेकरुन मारुती मंदिराच्या बाजूच्या परिसरात पाणी साचण्याचे प्रमाण कमी होईल. या परिसरात पाणी कोणत्या स्तरापर्यत साचते, त्यावर काय मार्ग निघू शकतो याबाबत आयुक्त श्री. बांगर यांनी परिसरातील स्थानिक नागरिकांशी चर्चा केली. तलावपाळीवरुन पाण्याचा ओव्हरफ्लो पेढया मंदिराच्या बाजूच्या नाल्यामध्ये न जावू देता जर दुसऱ्या बाजूच्या नाल्यात सोडला तर त्या परिसरातील पाणी साचण्यावर मार्ग निघू शकेल, तसेच त्या संपूर्ण परिसरातील पावसाळी गटारामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला निदर्शनास आला. त्या गाळाची साफसफाई व्हावी म्हणून चेंबर्सची संख्या वाढवावी किंवा संपूर्ण पावसाळी गटार खुले करुन गाळ काढण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित यंत्रणेला दिले.
तसेच चिखलवाडी, भांजेवाडी या परिसरात लावण्यात आलेल्या पंपाची पाहणी देखील आयुक्तांनी केली. या ठिकाणी असलेल्या तबेल्यांमध्ये निर्माण होणारा कचरा किंवा इतर टाकावू गोष्टी घेवून जाण्यासाठी स्थानिक स्वच्छता निरीक्षक यांनी नियमित गाडीची खेप उपलब्ध करुन द्यावी, मात्र त्यांनतरही जर तबेले धारकांनी नाल्यामध्ये कचरा टाकला तर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्याची ताकीद संबंधितांना दिली. चिखलवाडी परिसरातील पंपाद्वारे काढण्यात येणारे पाणी रस्तयावर सोडले जात असल्याचे आढळले, तेच पाणी रस्ता क्रॉस करुन नवीन कोपरी पुलाच्या बाजूच्या पावसाळी गटारामध्ये सोडले तर पुन्हा त्या चौकामध्ये पाणी साचणार नाही ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्या पध्दतीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ठाणे रेल्वेस्टेशन येथील एक नंबर प्लॅटफॉर्मकडे जाणाऱ्या पावसाळी नाल्यावर काही ठिकाणी रेल्वेने पाण्याचा प्रवाह कंट्रोल करण्यासाठी दरवाजे बसविले आहेत, मात्र त्यामुळे एक नंबर प्लॅटफॉर्मकडे जाताना सांडपाणी मोठ्या प्रमाणावर रस्तयावर येत असल्याची तक्रार नागरिकांकडून प्राप्त झाली तरी प्लॅटफॉर्मच्या पूर्वीचा पहिला दरवाजा काही केल्या बंद होणार नाही याची दक्षता घ्याव आणि रेल्वेरुळांच्या मधील दरवाजे संपूर्ण बंद न करता रेल्वे रुळावर पाणी साचू नये याची दक्षता घ्यावी पण त्याचबरोबर ये-जा करणाऱ्या नागरिकांना गैरसोय होणार नाही यासाठी अतिवृष्टीच्या वेळी स्वच्छता निरीक्षक किंवा जबाबदार व्यक्ती प्लॅटफॉर्मवर पूर्णवेळ उपस्थित राहिल व रेल्वे अधिकाऱ्यांशी समन्वय साधेल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या समोर चिखलवाडी व मेंटल हॉस्पिटलकडून येणारे दोन नाले एकत्र येतात. मेंटल हॉस्पिटलकडून येणाऱ्या नाल्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे चिखलवाडीकडून येणाऱ्या नाल्याचे पाणी निचरा होवू शकत नाही व पाण्याचा फुगवटा वाढून मागे पाणी साचण्याची शक्यता निर्माण होते यासाठी दोन्ही नाले ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी वक्राकार पध्दतीने तात्पुरती भिंत बांधावी जेणेकरुन चिखलवाडी भागातून येणारे नाल्याचे पाणीही निचरा होवू शकेल अशा पध्दतीने कार्यवाही त्वरीत करण्याच्या सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या.
पावसाळी गटारांच्या जाळ्या काढून कचरा काढावा
दिनांक 28 जून 2023 रोजी झालेल्या पावसाने ज्या ज्या ठिकाणी पाणी साचले होते, त्या परिसरातील चारही बाजूच्या पावसाळी गटार वाहिन्यांच्या जाळ्या काढून वाहून आलेला कचरा काढला जावा, जेणेकरुन या नंतर जेव्हा अतिवृष्टी होईल त्यावेळी हे पाणी वाहून जाण्यास मदत होईल.
अतिवृष्टीच्या काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या आहेत. यावेळी उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, तुषार पवार, शंकर पाटोळे तसेच विभागातील स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.