माणसामाणसामध्ये विद्वेष वाढवणार्या ज्याप्रवृत्ती आहेत त्यांच्या हातामध्ये सत्ता जाणार नाही याची काळजी घेण्याचे जे आव्हान आहे त्या आव्हानाला सामोरे जाणे तुमचं – माझं कर्तव्यच नाही तर धर्म आहे
- शरद पवार
रौप्यमहोत्सवी राष्ट्रवादी, विचार भविष्यवादी… आचार, विचार, निर्धार फक्त राष्ट्रवादी…
राष्ट्रवादीचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात उत्साहात साजरा…
मुंबई
दि. २१ जून – ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे उद्याच्या निवडणुकीत पुन्हा त्यांच्या हातात सत्ता आली तर चिंता वाढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करतोय, पुढाकार घेतोय की देशातील लोकशाहीवर विश्वास असणार्या सर्व पक्षांना एकत्र करून देशातील सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणारी जी लोकशाहीची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवर कुणी हल्ला करत असेल, तर त्या गोष्टी या देशात होऊ द्यायच्या नाहीत. लोक एकत्र करायचे, शक्ती उभी करायची आणि चुकीच्या, सांप्रदायिक जातीयवादी, माणसामाणसामध्ये विद्वेष वाढवणार्या ज्याप्रवृत्ती आहेत त्यांच्या हातामध्ये सत्ता जाणार नाही याची काळजी घ्यायची हे आव्हान आहे त्या आव्हानाला सामोरे जाणे तुमचं – माझं कर्तव्यच नाही तर धर्म आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी आज केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रौप्यमहोत्सव षण्मुखानंद सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आदरणीय शरद पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
आज राष्ट्रवादी पक्ष व त्याचा प्रत्येक कार्यकर्ता शक्तीने एकजुटीने वेगवेगळे वातावरण संघटनेमार्फत करतोय कारण देशातील लोकशाही, व्यवस्था या सगळ्यासंबंधी त्याकडे बारकाईने लक्ष देऊन एकसंघ समाज कसा राहिल याची काळजी घेत आहे. या प्रयत्नांची आज गरज आहे असेही शरद पवार म्हणाले.
ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे उद्याच्या निवडणुकीत पुन्हा त्यांच्या हातात सत्ता आली तर चिंता वाढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करतोय, पुढाकार घेतोय की देशातील लोकशाहीवर विश्वास असणार्या सर्व पक्षांना एकत्र करून देशातील सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणारी जी लोकशाहीची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवर कुणी हल्ला करत असेल, तर त्या गोष्टी या देशात होऊ द्यायच्या नाहीत. लोक एकत्र करायचे, शक्ती उभी करण्याचे काम होत असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
लोकांनी शक्ती दिली, सत्ता दिली आणि २५ वर्षात अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे योगदान आहे असे आवर्जून सांगतानाच कामगार, तरुण, महिला, अल्पसंख्याक, आदिवासी, दलित, भटक्या विमुक्त, यांचा विचार करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून याची नोंद राज्यातील जनतेच्या अंतःकरण झाली ही केवळ तुमच्या कष्टामुळे करता आली असे कौतुकही शरद पवार यांनी केले.
राज्यकर्त्यांनी शेती आणि शेतकरी याला फार महत्व दिले पाहिजे. हातामध्ये सत्ता असताना याचा वापर केला पाहिजे. शेतीप्रधान देश असताना या देशामध्ये परदेशातून धान्य आयात करण्याची स्थिती बदलली पाहिजे. हे एक आव्हान स्वीकारले आणि एका ठराविक काळामध्ये देशाची गरज भागवली पण जगातील अनेक देशात अन्नधान्य पुरवण्याचे काम केले याची नोंद संबंध देशाने घेतली याची आठवणही शरद पवार यांनी करुन दिली.
आज चित्र काय वेगळे दिसते आहे. आज शेतकरी अस्वस्थ झाला आहे. दुखावलेला आहे. शेतीमालाच्या किमती योग्य पध्दतीने मिळत नाही. कांदा, कापूस असो आज खान्देश मराठवाडामध्ये शेतकरी कापूस साठवून ठेवत आहे. ही परिस्थिती याअगोदर नव्हती. संपूर्ण अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. मोदींनी तीन वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन दुप्पट करु सांगितले पण केले नाही मात्र दुसरीकडे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या आहेत. आज गेल्या पाच महिन्यात राज्यात ३९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सर्वाधिक आत्महत्या होतात ही अवस्था राज्यात आहे याबद्दल तीव्र नाराजी शरद पवार यांनी व्यक्त केली.
राज्यकर्त्यांची कायदा व सुव्यवस्था पाळण्याची जबाबदारी असते मात्र महाराष्ट्रात जातीय दंगली झाल्या. शांतताप्रिय अशी ओळख राज्याची असताना सत्ताधारी सत्ता नाही त्याठिकाणी राग काढण्याचा प्रकार करत आहेत. कायदा व सुव्यवस्था ठीक नसेल तर दंगली स्वरुपात त्याची किंमत मोजावी लागते. लहान घटकांना संरक्षण द्यायचे असते परंतु आज महिलांची काय परिस्थिती आहे. २३ जानेवारी २३ मे २०२३ पर्यंत ३१५२ मुली व महिला गायब आहेत भगिनींचे संरक्षण करण्यात सरकार काय करतेय असा संतप्त सवालही शरद पवार यांनी केला.
राज्यकर्त्यांना एक खबरदारी घ्यावी लागते परंतु ती घेतली जात नाहीय. मणीपूरमध्ये दंगली होत आहेत. जे घडतंय त्याकडे केंद्रसरकार ज्याप्रकारे बघतेय त्यावरून आम्ही नागरीक आहोत की नाही अशी चिंता त्यांना वाटत असेल.म्यानमारच्या सीमेवर मणीपूर आहे. चीनच्या सीमेवर काही भाग येतो आहे. त्याठिकाणी अशी परिस्थिती असेल तर काय उपयोग आहे. मात्र त्याकडे लक्ष द्यायला वेळ केंद्र सरकारला वेळ नाही याबाबत नाराजी शरद पवार यांनी व्यक्त केली.
प्रत्येकाने पदांची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. संसदेत कार्यक्रम झाला त्यात राष्ट्रपतींना निमंत्रण दिले गेले नाही. का निमंत्रण दिले नसेल तर साधी गोष्ट आहे. उद्घाटन कुणी केले मोदी यांनी. राष्ट्रपतींना बोलावले असते तर प्रोटोकॉल पाळला गेला असता आणि राष्ट्रपतींचे नाव आले असते म्हणून त्यांना न बोलवण्याचे कारण समोर आले आहे.माझं नाव त्याठिकाणी असलं पाहिजे. दुसरं कुणाचं चालणार नाही याच्याशिवाय दुसरं कारण नाही असा उपरोधिक टोलाही शरद पवार यांनी लगावला.
आजचे राज्यकर्ते सर्व संस्थाची इज्जत राखायची नाही ही भूमिका घेऊन काम करतात असेही शरद पवार म्हणाले.
याच व्यासपीठावरून २४ व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. महाराष्ट्र पवारसाहेबांमागे का उभा राहिला हे आपल्याला कळले असेल. राज्याचा असा कोणताही कानाकोपरा नाही तिथे पवारसाहेबांचे नाव नाही. जिथे निवडणूक लढलो नाही तिथेही पवारसाहेबांचे नाव आहे. पवारसाहेबांच्या रुपाने विचारांची शिदोरी आपल्यासोबत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आज परिस्थिती विचित्र आहे, शेतकऱ्यांच्या, श्रमिकांच्या, वंचितांच्या, बहुजनांच्या, जनसामान्यांच्या हक्क मारले जात आहेत. शेतकऱ्यांच्या, श्रमिकांच्या, वंचितांच्या, बहुजनांच्या, जनसामान्यांच्या हक्कासाठी हा पक्ष स्थापन केला गेला होता. हा पक्ष आजपर्यंत त्याच वाटेवर चालत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार साहेबांचे विचार लोकांना एक आशेचा किरण वाटत आहे. पवारसाहेबांचे या देशात मोठे योगदान आहे. कृषीमंत्री असताना त्यांनी आयात करणारा देश निर्यात करणारा देश बनवला
आज कृषी मंत्री कोण हे लोकांना माहिती नाही.ओडिशामध्ये रेल्वे दुर्घटना झाली तेव्हा रेल्वेमंत्री कोण हे देशाला कळले. नाहीतर पंतप्रधान मोदीच हिरवा झेंडा दाखवायचे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
आज देशात इव्हेंटचे राज्य सुरू आहे. कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट केला जात आहेत. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवली जात आहे. कोणीही कितीही दडपशाही केली तरी शिंदे आणि त्यांच्या आमदारांना लोक गद्दारच म्हणत आहेत. पन्नास खोके म्हटले तर आपसूकच तोंडातून एकदम ओके निघते असेही जयंत पाटील म्हणाले.
आज राज्यभरात दंगली घडत आहे. दंगलीचा पॅटर्न बघितला तर लक्षात येईल की जिथे भाजप शिंदे गटाची ताकद नाही तिथे या दंगली घडत आहे. मला सरकारमधील मंत्र्यांना सांगायचे आहे की तुम्ही काहीही करा पण महाराष्ट्रात हा प्रकार थांबवा असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.
भाजपने ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजाची फसवणूक केली. मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाविरोधात कोर्टात कोण गेले आहे याची माहिती आपण घ्यावी… त्यांचे धागेदोरे नागपूरच्या कोणत्या नेत्यापर्यंत आहेत. तेव्हा आपल्याला लक्षात येईल की मराठा आरक्षणाच्या विरोधात नेमकं कोण आहे असाही टोला जयंत पाटील यांनी लगावला.
१९७० ते २०१९ पर्यंत निळवंडे धरणाच्या कामासाठी ११०० कोटी रुपये खर्च करून केवळ ४५ टक्के काम पूर्ण झाले होते. आमच्या महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांत जवळपास ९०० कोटींचा निधी देऊन या धरणाचे ९० टक्के काम पूर्ण केले. मी स्वतः जलसंपदा मंत्री म्हणून धरणाच्या कामाला ३ वेळा भेट देऊन काम जलदगतीने पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न केले. कोविडची भयंकर परिस्थिती असताना देखील आम्ही न थांबता हे काम एका निर्णायक टप्प्यावर आणून ठेवले हेही जयंत पाटील यांनी आवर्जून सांगितले.
कोरोनाची परिस्थिती असताना देखील १४० कामे आम्ही पूर्ण केली. तंटामुक्त अभियान, २५-१५ योजना, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, अशा विविध योजना या राष्ट्रवादीच्या माध्यमातून झाल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
देशात संविधानाची पायमल्ली केली जात आहे. परवा नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा झाला परंतु देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ति राष्ट्रपतींना निमंत्रण दिले गेले नाही. का त्या आदिवासी होत्या म्हणून ? खेळाडू उपोषण करतायत त्यावर बोलायला देशाच्या नेत्यांना वेळ नाही. मणिपूरमध्ये हिंसाचार वाढला आहे मात्र पंतप्रधान अमेरिकेच्या दौऱ्यावर निघून गेले आहे यावर जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आपल्या राज्यात आपल्या महापुरुषांचा राजरोसपणे अपमान केला जात आहे. माजी राज्यपालांचा तर सध्याच्या सरकारमधील लोकांनी जाताना सत्कार केला. पण यांनी शिवबांबाबत खालच्या पातळीचे विधान केले. महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
येणाऱ्या काळात राष्ट्रवादी पक्षाच्या जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात निवडून येतील यासाठी आपण सर्वजण आज एकजुटीने आणि एक दिलाने काम करण्याचा संकल्प करूया. येणारा काळ हा मोठा संघर्षाचा आहे. निवडणूक कधी होईल सांगता येत नाही पण आपण ग्राऊंडवर तयार रहायला हवे असे आवाहन जयंतराव पाटील यांनी केले.
नवीन लोकांना संधी द्यायला हवी या मताशी सहमत आहे. पवारसाहेबांसारखं एक कणखर नेतृत्व उदयाला आले. इतके बहुआयामी नेतृत्व आपल्याकडे असतानाही आपण राज्यात स्वबळावर निवडून आलो नाही किंवा सर्वात मोठा पक्ष बनवू शकलो नाही ही शोकांतिका आहे असेही खासदार प्रफुल पटेल म्हणाले.
२५ वर्षात पदार्पण झाले आहे. पवारसाहेबांना पुन्हा संधी मिळवून द्यायची असेल तर कंबर कसून कामाला लागले पाहिजे असे आवाहन प्रफुल पटेल यांनी केले.
शरद पवार यांना दिल्ली राजकारणात कसे मागे खेचण्यात आले याची माहिती यावेळी खासदार प्रफुल पटेल यांनी दिली.
पक्ष अधिक मजबूत करायचा आहे. २५ वर्षे मागे वळून पाहिले तर कुणाला संधी मिळाली तर कुणाला मिळाली नाही. कोण कधी आला त्याला महत्व नाही शेवटी संघटना वाढवताना सर्व समाजाला घेऊन जाणारा जीवाभावाचा नेता आहे हे महत्वाचे आहे. नंतर आलो अशी भावना कुणी वाटून घेऊ नये. उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोचू शकतो हे राष्ट्रवादीमुळे घडू शकले हेही अजित पवार यांनी आवर्जून सांगितले.
मंत्री नसताना जबाबदारी उचलली पाहिजे. मंत्री स्वतः शिवाय कुणाला निवडून आणत नाहीत ते योग्य नाही. त्यांनी पदाचा व सत्तेचा वापर सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी केला पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.
भाषणं लिहून आणि बोलून पक्ष मोठा होणार नाही. त्या भाषणांनी स्फुर्ती मिळेल पण पक्ष मोठा होणार नाही. हे अपमान करण्यासाठी बोलत नाही. ममता बॅनर्जी एकट्याच्या जीवावर सत्ता आणू शकतात. जी या सगळ्या नेत्यांची नावे घेतली यात उजवा नेता शरद पवारसाहेब आहेत. पण आपण एकटया ताकदीवर आलो का? आपली विदर्भ आणि मुंबईत पक्षाची काय स्थिती आहे यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
आनंदाचा दिवस साजरा करताना आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करायची गरज आहे. बदल करण्याची गरज आहे. भाकरी फिरवायची तर ती फिरली पाहिजे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
वारकरी संप्रदायाची फार मोठी परंपरा आहे. आषाढी एकादशीमध्ये वारकरी सहभागी होतात. नरहरी झिरवाळ व इतर आमदार ‘वारी आपली दारी’ हा स्तुत्य उपक्रम राबवत आहेत.
आमदारांना व सर्व कार्यकर्त्यांनी ‘वारी आपल्या दारी’ हा उपक्रम राबवावा असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
आठ – दहा दंगली राज्यात का घडल्या. जातीय सलोखा बिघडावा, तेढ निर्माण केली जाते आहे. त्यामुळे आपण आपली जबाबदारी योग्यरीतीने पार पाडली पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.
महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. गुंड प्रवृत्तीच्या घटना वाढत आहेत. पोलीस यंत्रणा उत्तम आहे पण मोकळीक दिली जात नाही. हस्तक्षेप वाढला आहे. नोकराप्रमाणे त्यांना वागवले जात आहे. महाराष्ट्राची बदनामी होत आहे. सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सध्या सुरू आहे. या घटना पुरोगामी विचारांना, त्यांच्या प्रतिमेला छेद देणार्या आहेत. शिंदे यांना सांगितले की, ते तुम्ही माझ्यावर टीका करता असे बोलतात. अहो तुम्ही नुसती दाढी कुरवाळत बसता… चांगलं काम करा ना…असा टोला अजित पवार यांनी लगावला.
काल परवा झालेल्या मेळाव्यात पार सगळ्या प्राण्यांची नावे घेण्यात आली त्याने
महागाई, बेरोजगारी कमी होणार आहे का? महिलांवर अत्याचार थांबणार आहेत का? गुवाहाटी फिरुन आलात हे करायला आलात का? असा सवालही अजित पवार यांनी केला.
पवारसाहेबांवर केलेला शाब्दिक हल्लाही आम्ही यापुढे सहन करणार नाही. समाजात आमची प्रतिमा कोण मलीन करत असेल तर तेही खपवून घेणार नाही असा इशाराही अजित पवार यांनी दिला.
आज ‘योगा डे’ वर करोडो रुपये खर्च करण्यात आले. त्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना बघवत नाही तरी बघावं लागतं आहे. राज्यात पावसाचा थेंब पडत नाहीय. पाण्याची वाईट परिस्थिती आहे. याची सरकारला चिंता नाही याबाबत अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आपण सगळ्या प्रकारची पदे भूषविली आहेत त्यामुळे संघटना मजबूत हवी. वंचित आणि बीआरएसला डोळेझाक करून चालणार नाही. निवडणूकीत चांगले वातावरण केले तरी हे बारकावे लक्षात घेतले पाहिजे. समविचारी मतांची विभागणी होऊ देऊ नका. बीआरएस पक्षाचे स्वतः च्या राज्यात लक्ष नाही तेवढे लक्ष महाराष्ट्रात आहे. त्यामुळे बुथ कमिट्या चांगल्या करा. ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ हा कार्यक्रम करा असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न लोकसभा आणि विधानसभेला करत आहोत असे सांगतानाच विरोधी पक्षनेते पदावर जास्त आग्रही नाही. त्यामुळे मला यातून मुक्त करा. जे पद द्याल त्या पदाला न्याय देण्याचे काम करेन असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जाहीर केले.
राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांचे, कार्यकर्त्याचे आभार मानतानाच खासदार सुप्रियाताई सुळे यांनी निष्ठेने, मेहनतीने दिलेले काम पूर्ण करेन असा विश्वास व्यक्त केला.
अनेक नेत्यांना आपण २४ वर्षात गमावले आहे. आव्हान येते तेव्हा काम करायला आवडते. आपण अकरा महिने काम करणार आहोत त्याचा कार्यक्रम तयार असला पाहिजे. बुथ कमिट्यांचे काम कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. मंत्री आहेत त्यांना पाच ते सहा मतदारसंघ द्यावेत. सेल व फ्रंटल काय काम करतो त्याची रिपोर्टींग सिस्टीम असली पाहिजे. ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ हा उपक्रम राबविण्याची गरज आहे. दौरा नियोजन झाले पाहिजे. महिन्यातून एकदा प्रत्येक जिल्ह्यात गेले पाहिजे. राज्य पिंजून काढा की राष्ट्रवादीच आहे दुसरा पक्षच दिसत नाही असे चित्र निर्माण करा असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले.
पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणार होतात त्याचे काय झाले. सातत्याने संसदेत आरक्षणाचा मुद्दा लावून धरला होता. महाराष्ट्रात धनगर आरक्षण देणार बोलतात मात्र दिल्लीत याबाबत भाजपचा विरोध आहे भाजपच्या या दुटप्पी भूमिकेवर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी हल्लाबोल केला.
कोविड काळात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चांगले काम केले. रेमडेसिवीर लससाठी किती आटापिटा करण्यात आला. युको हमीद, पुनावाला यांनी तयार केलेली लस चालते मग जेव्हा हिंदू – मुस्लीम कशाला वाद घालता. देशाला सायरस पुनावाला यांनी वाचवले आहे हेही आवर्जून खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले.
अंधश्रद्धा वाढू लागली आहे. यात नुकसान महिलांचे होते आहे. अंधश्रद्धेमधून त्यांना पाठीमागे नेण्याचे काम केले जात आहे. कुठलाही धर्म सांगत नाही एक दिवस धर्मासाठी द्या असेही खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
अनिल देशमुख यांच्यावर १०९ वेळा सीबीआयने रेड केली हा जागतिक विक्रम यंत्रणांनी केला. नवाब मलिक यांनाही तुरुंगात डांबले आहे. त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्यात आला हे सांगतानाच ‘जब घुमके आयेंगे ना’ त्यावेळी या कुटुंबांची हाय लागेल हे लक्षात ठेवा असा इशारा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिला. याशिवाय पक्षासाठी त्याग करणार्यांसोबत उभे राहिले पाहिजे असेही खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
गद्दार बोलणार्यांना जेलमध्ये टाकणार का.. एक वेळ नाही तर शंभर वेळा बोलेन… हा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिला आहे. गद्दार ही शिवी नाहीय. सत्तेचा किती गैरवापर कराल. ५० खोके म्हणजे ४० आमदार दोन हजार कोटी रुपये सरकार पाडण्यासाठी वापरण्यात आले असा आरोपही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसवर आता जास्त जबाबदारी आली आहे. राष्ट्रवादी ताकदीने किंवा सदस्याची संख्या कमी असली तरी संसदेत जास्त परफॉर्मन्स देणारा राष्ट्रवादी काँग्रेस आहे याची आठवणही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी करुन दिली.
पुरोगामी महाराष्ट्र फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच देऊ शकतो. हा पक्ष सेवा, सन्मान, स्वाभिमान… सेवा विद्येची करुया… सन्मान शेतकऱ्यांचा करुया आणि स्वाभिमान महाराष्ट्राचा जपुया अशा शब्दात खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आपल्या भाषणाची सांगता केली.
ओबीसी आरक्षण ५४ टक्के पवारसाहेबांनी दिले. मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्याचा ‘पण’ पवारसाहेबांनी केला ऐतिहासिक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले याची आठवणही छगन भुजबळ यांनी सांगितली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेची कथाच छगन भुजबळ यांनी सांगितली.
राष्ट्रवादी काँग्रेसने गोरगरीब सर्व समाजासाठी निर्णय घेतले. आता तर अपमान केले जात आहेत. मुख्यमंत्री यांच्यावर बोलल्यावर चार तासात आरोपी पकडले जातात मात्र सावित्रीबाई फुले यांच्यावर गलिच्छ बोलणार्याला अद्याप अटक करण्यात आली नाही. महाराष्ट्र सदनात सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हलवले. वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला जातो. हे तुमचे हिंदुत्व आहे का असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केला.
तुम्ही इतिहास काढून टाकता तुम्हाला इतिहास माफ करणार नाही. रोज हिंदू – मुस्लीम केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम समाज कसा होता हे सांगतानाच औरंगजेब औरंगजेब काय करताय, कोण आहे औरंगजेब… निवडणूक आली की दंगे घडवले जातात. त्यात मरतं कोण गरीब दलित आणि मुस्लिम लोकं या दंगलीत गरीबांची मुलं आत जातात, नेत्यांची जातात का? असा सवालही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
अहिल्यादेवी नगर नाव दिले ठिक आहे परंतु अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास माहित आहे का? यशवंतराव होळकर यांनी सैन्य गोळा करून इंग्रजांना धुळ चारली आणि दुसरा राज्याभिषेक हा यशवंतराव होळकर यांचा झाला. नाव देण्याच्या कार्यक्रम झाला त्यात टोप्या घालण्यात आल्या त्या पेशव्यांच्या होत्या. ज्या पेशव्यांनी होळकरांना त्रास दिला त्याच पेशव्यांच्या टोप्या कशाला दिल्या यांना काय इतिहास माहित नाही अशा शब्दात छगन भुजबळ यांनी शिंदे सरकारचे वाभाडे काढले.
दिल्लीत डबल इंजिन सरकार बोलतात परंतु ट्रीपल इंजिन एकावर एक चढले ३०० लोकं मेली तरी काहीजण झेंडे दाखवत आहेत. आता त्या संसदेत काय तो दांडा घेऊन आले त्याला सेनगवर काय ते बोलतात ते घेऊन आले उघडेबंब लोक… असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी करताच सभागृहात एकच हंशा पिकला…
मणीपूरची परिस्थिती काय आहे. दोनशे लोक मारले गेले. काहीच करत नाहीत. आता महाराष्ट्रात तर नवीन सर्व्हे करण्यात आला त्यात ‘देशात मोदी आणि राज्यात शिंदे’ मात्र देवेंद्र फडणवीस गुल… असा टोला लगावतानाच दुसर्या दिवशी पुन्हा फोटो छापून शिंदेसेना फक्त… हा फेविकॉलचा मजबूत जोड बोलता पण हा असला कसला डुप्लिकेट फेविकॉल तुमचा अशा शब्दात छगन भुजबळ यांनी शिंदे – फडणवीस सरकारची खिल्ली उडवली.
देशाचे सगळे लक्ष सध्या पवारसाहेबांकडे आहे. मोदी सांगतात पवारसाहेबांची करंगळी पकडून राजकारणात आलो परंतु मोदीसाहेब, पवारसाहेब हे गोरगरीबांसाठी झटत आहेत. ‘चिराग बनकर जल सकोगे, आप मोम बनकर पिघल सकते हो क्या’… अशा शायरीने छगन भुजबळ यांनी भाषणाचा शेवट केला.
शक्तीस्थळावर हल्ला करण्याचा प्रयत्न होतो आहे. पवारसाहेबांनी निर्माण केलेली ही फळी अशीच पुढे नेण्याचे काम करायचे आहे असे आवाहन राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले.
अनेक चढउतार पवारसाहेबांच्या कारकीर्दीत पाहिले आहेत. विधायक वळण राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर मिळाले असे सांगतानाच स्वाभिमानी विचार देण्याचे काम पवारसाहेबांनी केले याची आठवणही सुनिल तटकरे यांनी करुन दिली.
महाविकास आघाडी बनवून सत्तेत आलो. राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष बनेल याची खात्री आहे असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
या सभेत जयदेव गायकवाड, खासदार फौजिया खान, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री एकनाथ खडसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केले तर आभार नरेंद्र राणे यांनी मानले
यावेळी शिव शाहू फुले आंबेडकर यांची पुस्तके आणि शाहू फुले आंबेडकर प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. ही पुस्तके ग्रंथालयात देण्यात येणार आहेत असे जाहीर करण्यात आले.
या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री हसन मुश्रीफ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार फौजिया खान, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रीय सरचिटणीस नरेंद्र मेहता, राष्ट्रीय प्रवक्ते नसिम सिद्धीकी, क्लाईड क्रास्टो, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण, मुंबई कार्याध्यक्षा राखी जाधव, कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, बसवराज पाटील नागराळकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, आदींसह आमदार, माजी खासदार व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.