बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेबद्दल केंद्र सरकार ना महाराष्ट्र सरकार गंभीर – खासदार सुप्रियाताई सुळे

ज्याठिकाणी मुलींचे वसतीगृह आहे तिथे कॅमेरे, चांगली लॉकींग सिस्टीम व मुलींची सुरक्षितता याला प्राधान्य द्या

डाळीचे भाव गगनाला भिडले यामध्ये केंद्रसरकारचे सातत्याने गैरव्यवस्थापन दिसते…

जेव्हापासून भाजप सरकार सत्तेत आले आहे तेव्हापासून सारखे वातावरण दुषित का होते आहे;हे गृहमंत्रालयाचे अपयश…

ज्या सरकारने ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ चा नारा दिला त्यांनीच बेटीला न्याय दिला नाही…

 

मुंबई

दि. ७ जून – मुंबईत वसतीगृहात मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एकतर महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेबद्दल केंद्रसरकार गंभीर आहे ना महाराष्ट्र सरकार गंभीर आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

महिलांचे, मुलींचे वसतीगृह आहे तिथे कॅमेरे व चांगली लॉकींग सिस्टीम व मुलींची सुरक्षितता याला प्राधान्य दिलेच पाहिजे. आता तर सातत्याने मुलींच्या किंवा महिलांच्या विरोधात ज्या घटना घडत आहेत त्याबाबत केंद्र व राज्यसरकारचा अप्रोच आहे त्यावरुन ते गंभीर दिसत नाहीत हे दुर्दैवी आहे असेही खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

ज्याने कृत्य केले त्याने आत्महत्या केली आहे त्यामुळे आता पहिल्यांदा वसतीगृहाची सुरक्षितता, त्यामध्ये हेल्पलाईन असतील, अलार्म बेल आणि कॅमेरे यांना प्राधान्य देत सरकारने लवकर पाऊले टाकली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मांडली आहे.

 

डाळींचे दर वाढले आहेत याचे मला आश्चर्य वाटत नाही कारण दोन वर्ष सातत्याने संसदेत वाढत्या अन्नधान्याच्या किमतीवर बोलत आहे. केंद्रसरकारकडे स्टडी पॉलिसी नाहीय. कांद्याची जगात कमतरता होती परंतु महाराष्ट्रात सरप्लस कांदा होता त्यावेळी कांदा एक्स्पोर्ट करा असे आम्ही सांगत होतो मात्र तो केला नाही. आज ना कांद्याला भाव नाही ना इतर वस्तूंना आहे. शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. डाळीचे भाव गगनाला भिडले आहेत. यामध्ये केंद्रसरकारचे सातत्याने गैरव्यवस्थापन दिसून येते असा थेट हल्लाबोलही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केला.

 

मला गंमत आणि आश्चर्य एका गोष्टीचे वाटते की जेव्हापासून भाजप सरकार सत्तेत आले आहे तेव्हापासून सारखे वातावरण दुषित का होते आहे असा थेट सवाल खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला.

नगरची घटना घडली आता कोल्हापूरमध्ये घटना घडली आहे सारखेच तणावाचे वातावरण राज्यात कसे होते असा सवाल करतानाच अशाच गोष्टी घडत राहिल्या, दंगली होत राहिल्या तर यामुळे राज्याचे नुकसान होणार आहे अशी भीती व्यक्त केली. शिवाय जनता ही घाबरलेली व बिथरलेली आहे त्यामुळे हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे असा आरोपही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केला.

देशातून किती विरोध होतो आहे हे आता भाजपच्या लक्षात आले आहे. आंदोलन करणार्‍या मुलींचे गार्‍हाणं ऐकायला इतके दिवस का लागले? याचा अर्थ त्यांना अपयश दिसत आहे, देशातून रोष दिसत आहे. या देशातील प्रत्येक महिलेला राग आला आहे. ज्या सरकारने ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ चा नारा दिला त्यांनी त्यांच्या बेटीला न्याय दिला नाही. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भाजपच्या विरोधात द्वेष आणि राग आहे. आंदोलनकर्त्या मुलींवरील अन्याय केला आहे ही चूक भाजपच्या लक्षात आल्यावर शेवटी ‘देर आये दुरुस्त आये’ असा टोलाही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भाजपला लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button