बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात संगीत कारंजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संघर्षनगर, चांदिवली येथे सुपर स्पेशालिटी इस्पितळाचे भूमीपूजन

मुंबई,

नागपूर येथील फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून संगीत कारंजे साकारण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले.

संघर्षनगर, चांदिवली, साकीनाका येथे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 400 कोटी रुपयांच्या खर्चातून बांधण्यात येणाऱ्या सुपर स्पेशालिटी इस्पितळ आणि क्रीडा संकुलाचा पायाभरणी व भूमीपूजन सोहळा आज सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी आमदार दिलीप लांडे, आमदार भरत गोगावले उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. त्याचबरोबर देशाची आर्थिक राजधानीही आहे. मुंबईत परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यानुसार मुंबई शहराचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. त्याबरोबर मुंबई महनगरपालिकेच्या तिजोरीत ११ हजार कोटींची भर पडली आहे. महाराष्ट्रात पायाभूत सोयी सुविधांचे सर्वाधिक प्रकल्प सुरू आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे विविध प्रकल्प मार्गी लागले आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक परदेशी गुंतवणूक होत आहे. त्यातही महाराष्ट्र अग्रेसर आहे. संघर्ष नगर परिसरात मूलभूत सोयीसुविधा पुरवून ते सुंदर नगर करण्यात येईल. राज्य सरकार सर्व सामान्य जनतेचे हे सरकार असून त्यांच्यासाठी आतापर्यंत विविध निर्णय घेतले आहेत. असाल्फा व्हीलेज येथील ४८ कुटुंबांसाठी खोल्या उपलब्ध करून देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

आमदार श्री. लांडे म्हणाले की, चांदिवली परिसराचा विकास घडवून आणणार आहे. शिधा वितरण कार्यालय लवकरच कार्यान्वित करण्यात येईल. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परिसरातील रस्त्यांचा विकास केला आहे. नागरी सेवा- सुविधा पुरविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. गरिबांच्या घरांच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. हिंदी भाषिकांसाठी शाळा सुरू केली. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी इस्पितळासाठी केंद्र सरकारची परवानगी आणून दिली, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी नंदेश उमप व सहकाऱ्यांनी नंदेश रजनी हा कार्यक्रम सादर केला. यावेळी लोकप्रतिनिधी, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button