ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली तातडीची बैठक
मुंबई,
ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी पाहता त्यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री पोलीस, परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. ठाणे शहरात सुरू असलेली विकासकामे १ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्ते करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी आयोजित बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस आयुक्त जयजित सिंह, महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, वाहतूक विभागाचे उपायुक्त विनय राठोड आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. हा रस्ता कुणाच्या मालकीचा आहे याचा विचार न करता त्यावरील खड्डे तत्काळ बुजवा. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात सध्या अनेक ठिकाणी विकासकामे सुरू असून त्याचा मोठा ताण ठाणे शहरावर पडला आहे, परिणामी जागोजागी वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे बहुतांश कामे ही १ जूनपूर्वी पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना आतापासूनच हाती घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.