कोविड रुग्ण संख्या प्रतिबंधासाठी प्रीकॉशन डोसची संख्या वाढवावी
- आरोग्य सचिव नवीन सोना
मुंबई
कोविड नियंत्रणासाठी टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, व्हॅक्सिनेट आणि कोविड अनुरूप वर्तन या पंचसूत्रीचा वापर केला जावा. तसेच प्रीकॉशन डोस देण्यावर भर द्यावा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना यांनी आज येथे दिल्या.
राज्यातील वाढत्या कोविड रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
यावेळी आरोग्य आयुक्त धीरजकुमार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ स्वप्नील लाळे, सहसंचालक डॉ गौरी राठोड, सहाय्यक संचालक डॉ. बबिता कमलापूर, उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, महापालिका आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.
सचिव सोना यांनी सांगितले की, टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे. त्यामध्ये आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. सीटी व्हैल्यू तीस पेक्षा कमी असणारा नमुना जिनोम सिक्वेन्सिंग पाठवला जावा. प्रिव्हेंशन डोसची संख्या वाढवावी. सारी आणि आयएलआय सर्व्हेक्षण जास्तीत जास्त प्रभावीपणे करावे.
राज्यात अद्याप साथरोग कायदा अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यातील तपासणीचे दर पूर्वीचेच दर आहेत, असे स्पष्टीकरण संचालक डॉ. अंबाडेकर यांनी सांगितले.