मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे
मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे
ठाणे जिल्ह्यातल मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरु झाला असून या मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींसह दिव्यांग, तृतीयपंथी, बेघरांनी आपले नाव मतदारयादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
पात्र मतदारांनी मतदारयादीत आपले नाव नोंदविण्यासाठी व्होटर हेल्पलाईन ॲप (VHA), एनएसव्हीपी व व्होटर पोर्टल या ऑनलाईन सुविधांचा वापर करावा. तसेच प्रत्येक मतदाराने प्रारुप मतदारयादीतील आपला तपशिल अचूक आहे का याची खात्री करावी, असे आवाहनही श्री. शिनगारे व श्री. जिंदल यांनी केले आहे. दिनांक 01 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली असून या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी सविस्तर माहिती दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, तहसीलदार श्री. सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
वंचित, बेघर, भटक्या व विमुक्त घटकांच्या नोंदणीसाठी विशेष लक्ष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम काळात युवावर्ग, दिव्यांग महिला, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, बेघर, भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्ती, तृतीयपंथी या घटकांची नोंदणी वाढवी, यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहे. आदिवासी महिलांच्या नोंदणीसाठीही मुरबाड, भिवंडी ग्रामीण, शहापूर येथे विशेष शिबिर घेण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेत वय वर्षे 18-19 वयोगटातील मतदार, तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आणि दिव्यांग मतदारांनी सहभागी होऊन आपले नाव मतदारयादीत समाविष्ट करून घ्यावे. याकरिता मतदारांनी आपल्या जवळच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे जाऊन मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 चे अर्ज भरुन द्यावे किंवा एनएसव्हीपी, व्हीएचए व व्हीपोर्टल या पोर्टलवर लॉग-इन करुन आपले नाव समाविष्ट करण्याबाबत ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन श्रीमती कदम यांनी केले आहे.