बातम्यामहाराष्ट्र

भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात अभूतपूर्व प्रतिसाद, राहुलजींच्या स्वागतासाठी पहाटेपासूनच हजारो लोक रस्त्यांच्या दुतर्फा उभे.

भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात अभूतपूर्व प्रतिसाद, राहुलजींच्या स्वागतासाठी पहाटेपासूनच हजारो लोक रस्त्यांच्या दुतर्फा उभे.

नांदेड, दि, ९ नोव्हेंबर :

सूर्य अजून उगवायचा होता, अंधुकसा संधिप्रकाश होता आणि गुलाबी थंडीने वातावरण ताजतवान केलं होतं. शिरस्त्यानुसार बुधवारीही उगवत्या सूर्याच्या साक्षीने हजारो पाऊले राहुलजी गांधींच्या मागे आणि पुढे कित्येक किलोमीटर पदयात्रेत चालत होती. सकाळी सहा वाजता पदयात्रा शंकरनगरहून नायगावच्या दिशेने निघाली. पुढे बँडपथक, मागोमाग पदयात्रा…!

रस्त्याच्या दोन्ही बाजूला गावांच्या वेशीला, नाक्यांवर, चौका-चौकात कुटुंबेच्या कुटुंबे, शाळकरी मुले, तरुण आणि वयोवृद्ध लोकही यात्रेच्या स्वागतासाठी उभे होते. गावागावातून क्षणाक्षणाला पदयात्रेत लोक सामील होत होते. सूर्य जसजसा वर येईल तसा यात्रेचा आकार वाढत होता. सात वाजेपर्यंत राहुलजींच्या मागे २ किलोमीटर आणि पुढे किमान ३ किलोमीटर माणसांची डोकी, सफेद सदरे दिसत होते.

साठी गाठलेल्या कमलाबाई आपल्या सुना-नातवंडांसह देगलूर-नांदेड मार्गाला लागून असलेल्या किनाळा (ता. नायगाव) या छोट्याशा गावाच्या मुख्य रस्त्याच्या कडेला पहाटे दीड-दोन तास उभ्या होत्या. ‘राहुल गांधी माझ्या मुलासारखा….त्यांना बघायला साडेपाच वाजल्यापासून आलोय,” असे त्या सांगत होत्या. त्यांच्या आजूबाजूला गावातील २५-३० महिला, मुलेही त्याच आकांक्षेने उभी होती. आज ते सर्वजण चार वाजताच उठून पदयात्रा पाहण्यासाठी, स्वागतासाठी आल्या होत्या. त्या रस्त्यावरून ६ वाजून २० मिनिटांनी पदयात्रा आली आणि कमलबाईंची इच्छा पूर्ण झाली. यात्रा जवळ येताच अशीच इच्छा असणारे हजारो हात अभिवादनासाठी उंचावत होते, ऊर्जा देत होते.

राहुलजींच्या सुरक्षा कड्याबाहेर कोणा साधूंचा एक समूह बरोबरीने चालत होता. आठ-दहा वारकरी भजन करत होते, कोणी फुले घेऊन, कोणी झेंडे उंचवत, कोणी महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा उंचावत, मुलींचे लेझीम पथक, कुठे पारंपरिक पोशाख, तर कुठे देशाची विविधतेतून एकता दर्शवणारी विविध रंगी वेशभूषा…असे अनेक रंग सोबत घेऊन पदयात्रा निघाली होती. “जातपात का बंधन तोडो…- भारत जोडो, भारत जोडो,” “वंदे मातरम”… अशा घोषणांनी वातावरण उत्साहाने भरून गेले होते. उत्साहाची ऊर्जा प्रत्येकाच्या चालण्या-बोलण्यातून, घोषणातून, कृतीतून जाणवत होती, ही ऊर्जा पुढे पुढे वेगाने वाहत होती.

नांदगावच्या शारजाबाई हनुमंत भद्रे वयाच्या पन्नाशीत यात्रेत पुढे होत्या, त्यांच्या सोबत ४० महिला आल्या होत्या. पहाटे लवकर उठून पाच वाजता आठ किलोमीटर अंतर कापून त्या शंकरनगरला आल्या होत्या. नायगावला मुस्लिम महिला मुलांसह मोठ्या संख्येने रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या होत्या. नरसी येथे लिटल स्टेप ज्ञानवर्धिनी शाळेच्या लहानग्या मुली एनसीसी गणवेशात स्वागतासाठी उभ्या होत्या, तर परभणीच्या पिंगळा येथील वारकरी शिक्षण संस्थेची मुले वारकऱ्यांच्या वेशभूषेत उभी होती.एका स्टेजवर गांधीजी, चाचा नेहरू, इंदिराजी यांच्या वेशभूषेत मुले होती, तर पुढे कथक नृत्यांगना सलामी देत होत्या. एका ठिकाणी स्वर्गीय राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली जात होती. विविध प्रकारे सामान्य जनता आपली भावना व्यक्त करत होती, आपण एक आहोत हेच ते राहुलजी गांधींना सांगत होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button