वेफर्सच्या ट्रक मधून होत होती गुटख्याची वाहतूक ५१ लाखांचा पानमसाला जप्त
वेफर्सच्या ट्रक मधून होत होती गुटख्याची वाहतूक ५१ लाखांचा पानमसाला जप्त
सोनगीर पोलिसांनी देवभाने फाट्यावर केलेल्या कारवाईत तब्बल अर्धा कोटींचा पानमसाला व तंबाखुचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत आयशर वाहनासह 51 लाखांचा पानमसाला व चेविंग टोबॅकोचा साठा जप्त करण्यात आला असून मध्यप्रदेशातील एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुध्द सोनगीर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनगीर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, मध्यप्रदेश मधून धुळ्यात अवैध्य रित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिस सतर्क झाले. शादाब शहा मोहंमद रफीक शहा रा. मोहन की बस्ती, मोती महल, महू जि. इंदोर (मध्यप्रदेश) हा तरुण आयशर (एमपी 13 / जीए 7852) या वाहनातून 51 लाख रुपये किमतीचा पानमसाला, चेविंग टोबॅकोचे पॅकेटस विक्रीसाठी इंदोरहून धुळ्याकडे वाहतूक करत आहे अशी पक्की माहिती पोलिसांना मिळताच पोलिस आपल्या कामाला लागले. सोनगीर पोलिसांनी देवभाने फाट्यावर सापळा रचून वाहनांची तपासणी सुरु केली असता तपासणी सुरु असतानाच संशयीत आयशर (एमपी 13 / जीए 7852) हा महामार्गावरुन जात असताना त्यास अडविले. या वाहनाची तपासणी केली असता त्यात 51 लाख 94 हजार किमतीचा गुटखा आढळून आला.
सोनगीर पोलिसांनी एकूण 51 लाख 94 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सोनगीर पोलिस पथकाने संबंधित ट्रक चालक शादाब शहा याला ताब्यात घेत वाहन पोलिस ठाण्यात आणले. तसेच या जप्त केलेल्या मुद्देमालाच्या तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी मालाची तपासणी करुन शादाब शाह मोहंमद रफिक शहा याच्याविरुध्द सोनगीर पोलिसांत रितसर फिर्याद दाखल केली.
गेल्या काही महिन्यांपासून धुळे जिल्ह्यात अवैद्य गुटख्याची वाहतूक सर्रासपणे सुरू आहे यामध्ये माहिती मिळाल्यानंतर काही प्रकरणात कारवाई होते, तर काही प्रकरणांमध्ये गुटका माफिया सर्रासपणे आपला गोरख धंदा सुरूच ठेवत असल्याचे प्रकार देखील समोर आले आहे. त्यामुळे आता गुटख्यावर पूर्णपणे पाय बंद घालण्यासाठी धुळे जिल्हा पोलिसांकडून काय उपाययोजना केल्या जातात हे देखील पान येणाऱ्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे.