चर्नी रोड स्थानकातील रेल्वे पुलाची पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली पाहणी
चर्नी रोड स्थानकातील रेल्वे पुलाची पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली पाहणी
मुंबई – पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोड स्थानकातील प्रवाशांसाठी बंद करण्यात आलेल्या पुलाची पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत लवकरच जिल्हाधिकारी, रेल्वे, मुंबई महानगरपालिका आदी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चर्नी रोड स्थानकातील उत्तर बाजूचा प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 वर उतरणारा पूल सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आला आहे. येथे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी नवीन पूल बांधण्यात येणार आहे. या परिसराची मंत्री श्री. केसरकर यांनी पाहणी केली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सहायक विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री.वर्मा, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे आदी उपस्थित होते.
पाहणी केल्यानंतर श्री केसरकर म्हणाले, प्रवाशांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने उपाययोजना करण्यात येईल. याबरोबरच सुरक्षितता देखील महत्त्वाची आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील हिमालय पूल पडल्यानंतर मुंबईतील धोकादायक असलेले पूल नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात येऊन पाडण्यात आले. चर्नी रोड हा मूळ मुंबईतील मुख्य भाग आहे. येथे प्रवाशांची संख्या लक्षात घेता तातडीची उपाययोजना म्हणून लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
डोंगरी, भायखळा पोलीस वसाहतीची पाहणी
डोंगरी तसेच भायखळा भागातील सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या पोलीस वसाहतींची पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली. यावेळी वसाहतीतील पोलीस कुटुंबियांशी संवाद साधून इमारतींच्या दुरूस्तीचे काम येत्या दोन महिन्यात सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या इमारतींच्या नूतनीकरण आणि दुरूस्तीचे काम दर्जेदार व्हावे, प्रत्येकाला त्यांच्या घरात शौचालय मिळावे, आता असलेल्या एकत्रित शौचालयाच्या जागी जिम, योगा करता येतील अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश पालकमंत्री श्री. केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी त्यांच्यासमवेत स्थानिक आमदार अमीन पटेल, डोंगरी येथे पोलीस उपायुक्त हरी बालाजी, भायखळा येथे पोलीस उपायुक्त योगेश कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील, उपअभियंता एन.सी.पाटील आदी उपस्थित होते.