करमणूकनागपूरपुणेबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

कास पठाराच्या पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ई-बस व बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण

कास पठाराच्या पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ई-बस व बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण

श्रीश उपाध्याय/

मुंबई
——————————-
सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार असून यासाठी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते तिथे सुरू करण्यात येत असलेल्या ४ – ई बसेसचे तसेच बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. तेथील पर्यटनाला चालना देण्यासाठी वॉक वे तसेच दर्शन गॅलरी (व्हिव्हिंग गॅलरी) सुरू करणे, स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी आराखडा तयार करणे, सुरक्षा वाढविणे तसेच, घनकचरा व्यवस्थापन याबाबतही कार्यवाही करण्यात येईल मंत्री लोढा यांनी सांगितले.
मंत्रालयातून मंत्री लोढा यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे, ई-बसेसचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाला प्रोत्साहन दिल्याबद्दल मंत्री लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, सरपंच यांचे आभार मानले. कास पठाराच्या संवर्धनासाठी तसेच या माध्यमातून स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

याप्रसंगी अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, पर्यटन संचालक मिलींद बोरीकर, सहसंचालक धनंजय सावळकर उपस्थित होते तर दूरदृश्यप्रणालीव्दारे सातारा येथून आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री लोढा म्हणाले की, पर्यटन विकासासाठी सर्वांचेच सहकार्य आवश्यक आहे, स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर असलेल्या कास पठाराच्या पर्यटनाचा ठेवा जपण्यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर वाढून नैसर्गिकरित्या कास पठार अधिक फुलावे यासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे. शासनाने नवीन महाबळेश्वरचे जे धोरण तयार केले आहे, त्यामध्येही कास पठारच्या विकासाला निश्चित वाव देण्यात येईल.

यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, कास पठारावील प्रदुषण रोखण्यासाठी ई-बसची सेवा प्रायोगिक तत्वावर सुरु करण्याचा शासनाचा चांगला निर्णय आहे. कास पठारावरील प्रदूषण कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायत व वन विभागाच्या वेळोवेळी बैठका घेतल्या आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना अधिकच्या सुविधा मिळाव्या तसेच नवीन पर्यटन स्थळांची निर्मिती करावी, यासाठी नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

कास पठारावरील फुले पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. येथील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ई – बस सेवा सुरु करण्यात येत आहे. ह्या ई – बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून उपलब्ध झाल्या आहेत. पर्यटकांचा प्रतिसाद पाहून पुढील वर्षापासून अतिरिक्त ई – बसेसचे नियोजन केले जाईल. तसेच कास संवर्धनासाठी आणखी उपाययोजना केल्या जातील, असे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी प्रास्ताविकात सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button