बातम्यामहाराष्ट्रमुंबई

वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून आरोग्य शिबिराचे आयोजन करावे – परिवहनमंत्री अनिल परब

वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून आरोग्य शिबिराचे आयोजन करावे - परिवहनमंत्री अनिल परब

आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून असंख्य पालख्या आणि भाविक श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असतात. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या वारकरी व भक्तांची संख्या पाहता त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, त्यासाठी एसटी महामंडळाकडून पंढरपूर येथे आरोग्य शिबिर आयोजित करावे. तसेच त्यांना पिण्यासाठी नाममात्र दरात स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिले.

दरम्यान, यात्रेदरम्यान महामंडळाने वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयी-सुविधांची परिवहन मंत्री श्री. परब स्वत: पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आज मंत्रालयात पंढरपूर यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.शेखर चन्ने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. परब म्हणाले, पंढरपूर यात्रेदरम्यान एसटीच्या प्रवासी वाहतूकीला अनन्यसाधारण महत्व असते. त्यामुळे वारकरी, भाविक तसेच प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यत घेऊन जाणे त्याचबरोबर श्री विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना सुखरूपपणे गावी सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असते. सर्वसामान्य नागरीक हे एसटीचे खरे प्रवासी दैवत आहेत. त्यामुळे पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांची तसेच नागरीकांची काळजी घेणे एसटी महामंडळाचे काम आहे. भरपावसात लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूर येथे पालख्यांसोबत चालत येतात. त्यांच्या सेवेसाठी एसटीनेही हातभार लावत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पंढरपूर येथे आरोग्य शिबिर आयोजित करावे.

पंढरपूर येथे तात्पुरती स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या चार एसटी स्थानकांवर हे शिबिर आयोजित करावे, यात्रेदरम्यान इंधनाचा आवश्यक साठा करून ठेवा. प्रवासादरम्यान बस बंद पडल्यास तातडीने पर्यायी बसेसची व्यवस्था करावी तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, असे निर्देशही श्री. परब यांनी बैठकीत दिले.

ग्रुप आरक्षणाला प्राधान्य

आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी राज्यभरातील असंख्य गावातून लाखोंच्या संख्येने नागरिक पंढरपूरकडे रवाना होत असतात. मात्र, अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी महामंडळाने ग्रुप आरक्षणाला प्राधान्य द्यावे, नागरीकांनी ग्रुप बुकिंग केले तर त्यांना गावच्या ठिकापासून ते पंढरपूर येथील विठूरायाच्या दर्शनानंतर त्यांना थेट त्यांच्या गावात सोडण्याची व्यवस्था करावी असेही परिवहनमंत्री ॲड. परब यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button