महाराष्ट्र दिनी भाजपाची मुंबईत “बुस्टर डोस” सभा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभेला संबोधित करणार
महाराष्ट्र दिनी भाजपाची मुंबईत "बुस्टर डोस" सभा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभेला संबोधित करणार
मुंबई, दि. 28 एप्रिल
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे, विविध रंगांचे, सुजलाम सुफलाम महाराष्ट्राचे समग्र दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमासह 1 मेला महाराष्ट्र दिनी भाजपाची मुंबईत ” बुस्टर डोस” सभा होणार असल्याची माहिती भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आज दिली.
कोरोना नंतर भव्य दिव्य स्वरूपात भाजपातर्फे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा केला जाणार आहे. 1 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील सोमय्या मैदानावर हा रंगारंग कार्यक्रम होणार असून भाजपाचे शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या निमित्ताने महाराष्ट्राचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच यावेळी विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची “बुस्टर डोस” सभा होणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे होणारे तडाखेबाज भाषण म्हणजे भाजपाच्या कार्यकर्त्यांना “बुस्टर डोस” असेल तर महाविकास आघाडीला “डोस” असेल असे आमदार अँड आशिष शेलार यांनी जाहीर केले आहे.
गेल्या काही दिवसात मेट्रोच्या पत्र्याच्या आड लपून भाजपाच्या पोलखोल सभांवर अती “विराट”म्हणजे एक दोन कार्यकर्ते दगड मारीत आहेत, त्याचा समाचार घेऊन मुंबईसह राज्याच्या विषयांवर सत्ताधारी पक्षाला “डोस” देणारी ही सभा असेल असेही आमदार अँड आशिष शेलार यांनी जाहीर केले आहे.
आता गृहमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करावा का?
कार्यक्रमात एक तलवार दाखवली म्हणून मोहीत भारतीय यांच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर आता महाराष्ट्रात ज्या पध्दतीने तलवारीचा साठा सापडलाय त्यावर आता राज्याच्या गृहमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करावा का? असा सवाल महाराष्ट्र करीत आहे. राज्यातील सरकार सर्वच आघाडीवर अपयशी ठरले असताना दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी, दंगली घडवण्यासाठी हे षडयंत्र तर नाही ना? अशी शंका ही आमदार अँड आशिष शेलार यांनी पत्रकारांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना उपस्थितीत केली.