महाराष्ट्रमुंबई

मंत्रीमंडळ बैठकीवर कोट्यवधींची उधळपट्टी हा मराठवाड्यातील दुष्काळी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार:- नाना पटोले | हे संवेदनशील नाही, गेंड्याच्या कातडीचे सरकार!

शेतकरी मरत असताना येड्यांच्या (EDA) सरकारकडून जनतेच्या पैशांवर पंचतारांकित मौजमजा!

मुंबई, दि. १५ सप्टेंबर
राज्यातील येड्याच्या सरकारने सर्व लाजलज्जा सोडलेली दिसत आहे. शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत आहे, मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड वाढलेल्या आहेत, मराठा आंदोलनासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. मराठवाड्यासह राज्यात एवढी गंभीर परिस्थिती असताना संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री, मंत्री व अधिकाऱ्यांची जनतेच्या पैशातून अलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये बडदास्त ठेवली आहे. सर्वसामान्य जनता महागाईत होरपळत असताना मंत्रीमंडळ बैठकीवर कोटयवधी रुपयांची उधळपट्टी करणे हा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. स्वतःला संवेदनशील म्हणून घेणारे सरकार प्रत्यक्षात मात्र गेंड्यांच्या कातडीचे आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळ बैठक होऊन मराठवाड्यातील जनतेचे प्रश्नी मार्गी लागत असतील तर त्याचे स्वागतच आहे पण त्यासाठी श्रीमंती थाट कशाला हवा? यापूर्वी संभाजीनगरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीवेळी आतापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी सुभेदारी या सरकारी विश्रामगृहात मुक्काम केला होता. पण एकनाथ शिंदे मात्र संभाजीनगरच्या सर्वात महागड्या अलिशान तारांकित हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत. त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री, मंत्री यांच्यासाठीही अलिशान हॉटेलमध्ये उत्तम सोय केली आहे. जेवणाची एक थाळी दीड हजार रुपयांची आहे अशा बातम्याही प्रकाशित झालेल्या आहेत. इतर अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीही हॉटेल व गाड्यांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. हा बडेजाव करण्याची गरज नव्हती, साधेपणाने शासकीय विश्रामगृहात राहिले असते तर मराठवाड्याच्या जनतेच्या प्रश्नावर चर्चा करता आली नसती का? पण सरकारला काही करायचे नाही फक्त दिखावा करायचा आहे. मराठा आरक्षणाच्या बैठकीप्रमाणे मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीमंडळ संभाजीनगरला येणार, “बैठक घेऊन बोलून रिकामे होणार आणि मराठवाड्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसून निघून जाणार.” असा टोला पटोले यांनी लगावला.
मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यातील खरीपाचे पीक वाया गेले आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्या शेतक-यांना सरकारने अद्याप काहीच मदत केली नाही. सरकारने जाहीर केलेल कांद्याचे अनुदान अद्याप दिले नाही. ओबीसी सह मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च वाढतो म्हणून तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी नोकर भरती करण्याचा निर्णय सरकार घेते, शासन आपल्या दारी म्हणत जनतेच्या पैशावर कार्यक्रम करुन स्वतःची जाहीरातबाजी करते. हे सरकार असंवेदनशील असून जाहीरातबाजी, इव्हेंटबाजी व आता मंत्रिमंडळ बैठकीवर वारेमाप खर्च करणारे हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे, असे नाना पटोले म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button