मुंबई: राज्यात काल ओमिक्रॉनचे (Omicron) ८ नवे रुग्ण आढळले असताना आज पुन्हा रुग्ण नवे रुग्ण आढळल्याने राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज ओमिक्रॉनच्या ६ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. यांपैकी ४ रुग्ण मुंबई विमानतळ सर्वेक्षणात आढळले असून पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. या बरोबरच राज्यातील एकूण ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या ५४ वर पोहोचली आहे. (omicron in maharashtra update 6 more patients were found to be infected with omicron in the state today out of these 4 found in mumbai airport surveillance and pune rural and pimpri chinchwad Municipal corporation 1 each)
राज्यातील ओमिक्रॉनची बाधा झालेल्या ५४ रुग्णांपैकी सर्वात जास्त २२ रुग्ण मुंबईत, पिंपरी चिंचवडमध्ये ११, पुणे ग्रामीणमध्ये ७, पुणे महापालिका क्षेत्रात ३,साताऱ्यात ३, कल्याण डोंबिवलीत २, उस्मानाबादमध्ये २ तर, बुलडाणा, नागपूर, लातूर आणि वसई विरारमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. या ५४ रुग्णांपैकी एकूण २८ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.मुंबईत निदान झालेल्या ४ रुग्णांपैकी १ रुग्ण हा मुंबईचा आहे. तर, त्यांपैकी २ रुग्ण हे कर्नाटक आणि १ रुग्ण औरंगाबादचा आहे. यांपैकी २ रुग्ण हे टांझानिया आणि इतर दोघे इंग्लंडमधून आले आहेत. या चारही रुग्णांचे लसीकरण पूर्ण झालेले असून त्यांना कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. या सर्वांना मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे
या पैकी पुणे ग्रामीणमध्ये आढळलेला रुग्ण हा दुबईहून जुन्नरमध्ये आलेल्या एका व्यक्तीच्या संपर्कात आला होता. या रुग्णालाही कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत.पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेला ओमिक्रॉॉन बाधित रुग्ण हा ४६ वर्षीय असून या रुग्णाने आखाती देशातून प्रवास केलेला आहे. या रुग्णाला सौम्य लक्षणे असून त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याने लशींचे डोस पूर्ण केलेले आहेत.