बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

महाराष्ट्रात परदेशी गुंतवणुकीसंदर्भातील सामंजस्य करारांबाबतचा कृती आराखडा तयार करावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

उद्योजक संघटना व उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक

मुंबई,

राज्यात होणारी परदेशी गुंतवणूक आणि परदेशातील विविध उद्योग संघटनांबरोबर आतापर्यंत केलेले सामंजस्य करार आणि त्यावरील कार्यवाहीचा आढावा घेवून या करारांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

विधानभवनात आज सायंकाळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजक संघटना व उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे रवींद्र पवार, उद्योजकांचे प्रतिनिधी सौरभ शहा, उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अविनाश रणखांब, मानसी पाटील यांच्यासह अमेरिकन- महाराष्ट्र विकास परिषदेचे मुकुंट कुटे व किशोर गोरे हे न्यू जर्सी येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, राज्य शासनाने गुंतवणुकीसंदर्भात विविध सामंजस्य करार केले आहेत. या करारांबाबतची माहिती संबंधित विभागांनी अद्ययावत करून त्यांच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा. या करारांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येईल. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आपल्यास्तरावरून या करारांबाबतची माहिती घ्यावी. तसेच लहान व मध्यम उद्योजकांना निर्यात वाढविण्यासाठी मार्गदर्शन करावे. त्यासाठी उद्योग संघटनांच्या सहकार्याने कार्यशाळेचे आयोजन करावे. यासंदर्भात लवकरच व्यापक आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

उद्योग विकास आयुक्त श्री. कुशवाह यांनी सांगितले की, राज्य शासन येत्या पाच वर्षांत निर्यात दुप्पट होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी शासन पातळीवरून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. प्रत्येक जिल्हानिहाय कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. याबाबत उद्योजकांमध्ये जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे श्री. पवार यांनी परदेशी गुंतवणूक आणि परदेशातील विविध उद्योजक संघटनांबरोबर झालेल्या सामंजस्य करारांची सविस्तर माहिती दिली. श्री. कुटे यांनी सांगितले की, भारत आणि अमेरिकेत लघु आणि मध्यम उद्योजकांना व्यवसायाची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यांना अमेरिकन- महाराष्ट्र विकास परिषद सर्वतोपरी सहकार्य करेल. निर्यात वाढविण्यासाठी लघु व मध्यम उद्योजकांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उद्योजकांचे प्रतिनिधी श्री. गोरे, सौरभ शहा यांनी मनोगत व्यक्त केले. विशेष कार्य अधिकारी श्री. खेबुडकर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button