महाराष्ट्रमुंबई

राज्यघटना अबाधित ठेवण्यासाठी भाजपाला सत्तेतून तडीपार करा: डॉ. भालचंद्र मुणगेकर

टिळक भवन येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

लोकसभेची निवडणूक ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी असून मोदी पुन्हा सत्तेत आले तर राज्यघटना बदलून देशात हुकूमशाही राजवट येईल. आरएसएसचा तर राज्यघटनेला पहिल्यापासूनच विरोध आहे. भाजपाचा ४०० पारचा नारा हा राज्यघटना बदलण्यासाठीच आहे, त्यामुळे घटना बदलणार नाही असे नरेंद्र मोदी कितीही सांगत असले तरी त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. मोदी पुन्हा सत्तेत आले की राज्यघटना बदलणार त्यामुळे लोकशाही व राज्यघटना अबाधित ठेवण्यासाठी भाजपा व नरेंद्र मोदींना सत्तेतून तडीपार करा, असे आवाहन माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले आहे.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना डॉ. मुणगेकर यांनी उपस्थितांना व राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा लोकशाही व राज्यघटनेवर विश्वास नाही. माजी सरसंघचालक गोलवलकर यांनी राज्यघटना ही गोधडी आहे असे म्हटले होते. भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी ४०० जागांचे बहुमत मिळाले की राज्यघटना बदलणार हे जाहीरपणे सांगितले आहे. पंतप्रधान मोदींचे आर्थिक सल्लागार यांनीही नवीन राज्यघटना करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता प्रत्येक प्रचार सभेत राज्यघटना बदलणार नाही असे सांगत असले तरी त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. काँग्रेसने राज्यघटना बदलली असा भाजपाकडून अपप्रचार केला जात आहे पण घटनेत दुरुस्ती करणे आणि घटना बदलणे याच फरक आहे. मोदी सरकारनेही निवडणूक आयुक्त नियुक्तीसंदर्भात नुकतीच घटना दुरुस्ती केली आहे.
लोकसभेसाठी दोन टप्प्यातील मतदान झाले असून भाजपाचा पराभव होत असल्याचे चित्र आहे, पराभवाच्या भितीने मोदी घाबरले असून आता ते, “मी फक्त निमित्त मात्र आहे, ईश्वरानेच मला पाठवले आहे” असे सांगत आहेत, याचा अर्थ मी देवाचा अवतार आहे, असे सांगून नरेंद्र मोदी जनतेची दिशाभूल करत आहेत असे मुणगेकर म्हणाले.
या कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रमोद मोरे, राजन भोसले, राजेश शर्मा, जोजो थॉमस, गजानन देसाई, उत्तर मुंबईचे काँग्रेस उमेदवार भूषण पाटील आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button