Uncategorized
Trending

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुलुंड येथील कुणबी विद्यार्थी वसतिगृहाचे उद्घाटन

सामाजिक कार्यात पुढे राहणाऱ्या संस्थांचा महाराष्ट्राला समृद्ध वारसा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 15 :- सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या संस्थाचा महाराष्ट्राला समृद्ध वारसा लाभला आहे. या संस्थांनी नेहमीच सर्वच जाती-धर्मांचं हित पाहिले आहे. लोकाभिमुख कामांमध्ये या संस्थांनी केलेले काम अतुलनीय आहे. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे कुणबी समाजोन्नती संघाच्यावतीने मुलुंड येथे उभारण्यात आलेले हे देखणे वसतीगृह असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

कुणबी समाजोन्नती संघाच्यावतीने मुलुंड (पूर्व) येथे उभारण्यात आलेल्या कुणबी विद्यार्थी वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, खासदार मनोज कोटक, कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे यांच्यासह संघाचे मान्यवर पदाधिकारी व नगरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी समाधानाचा आहे. समाजोन्नती संघांनी एक मोठी मजल मारली आहे. आपला हा वसतीगृहाचा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केला आहे. त्यासाठी कष्ट घेणाऱ्या सर्वांचे आपण अभिनंदन करतो. समाजाच्या योगदानातून समाजोपयोगी तेही शिक्षणाच्या क्षेत्रात असं भरीव काम होणं हे आपल्या महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे असून कुणबी समाजोन्नती संघाचे अभिनंदन.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शासनाने समाजातील सर्व घटकासाठी चांगले निर्णय घेतले आहेत. शासन हे सर्व सामान्यांचे आहे, सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी शासन काम करत आहे. ओबीसी समाजासाठी शासनाने अनेक निर्णय घेतले असून शासनाने इतर मागास बहुजन कल्याण विभाग सुरू केला आहे. या विभागाच्या माध्यमातून इतर मागास व अन्य समाजातील होतकरू तरुणांना, शिक्षण, स्वयंरोजगार आणि उद्योगांसाठी शासन पाठबळ देत आहे. ओबीसी समाजासाठी राज्यात 72 वसतिगृह सुरू करण्यात येत आहेत. ओबीसी समाजाला आवश्यक सोयी सुविधा पुरवणार असून ओबीसी समाजासाठी राज्यात दहा लाख घरे बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

शिक्षण आणि शैक्षणिक सुविधांमध्ये महाराष्ट्र पुढे आहे. त्याचे कारणही आपल्या या अशा संस्थाच आहेत. शासनही अशा संस्थांना पाठबळ देण्यात नेहमीच पुढाकार घेत आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल. शामराव पेजे महामंडळाला अधिकाचा निधी व परेल येथील वास्तूलाही आवश्यक निधी दिला जाईल. या बरोबरच तालुका स्तरावरील कुणबी भवनसाठी आवश्यक मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले,

कुणबी समाज हा शेतकरी आहे. मुलुंड येथे उभारण्यात आलेल्या या वसतिगृहात मुंबईत शिक्षणासाठी येणाऱ्या त्यांच्या मुलांची राहण्याची सोय होणार आहे, असे उद्योगमंत्री श्री.सामंत यांनी सांगितले.

शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळास अधिक निधी मिळावा. कुणबी समाजाच्या तालुकास्तरावरील कुणबी भवनसाठी निधी मिळावा, अशी मागणी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्याकडे भाषणदरम्यान केली.

खासदार सुनील तटकरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button