बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

नवरात्रोत्सव व छटपूजेसाठी सर्व व्यवस्था मुंबई महानगरपालिकाच करणार

मुंबई

 

मुंबई शहरात पहिल्यांदाच शिंदे – फडणवीस – अजित पवार महायुती सरकारच्या निर्देशानुसार मुंबई उपनगराचे पालकमंत्री मा.ना. मंगलप्रभात लोढाजी आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलारजी यांच्या उपस्थितीत नवरात्रोत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक मंडळ यांची संयुक्त बैठक आज दु.२.०० वाजता महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत या दोन्ही उत्सवांचे संपूर्ण नियोजन महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने करावे असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

सदर बैठकीत चर्चेअंती खालील निर्णय घेण्यात आले.

१. नवरात्रोत्सावासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या गणेश उत्सवाच्या धर्तीवरच एक खिडकी योजनेमार्फत देण्यात येतील.
२. बिगर व्यावसायिक नवरात्री मंडळासाठी परवानगी शुल्क, अग्निशमन शुल्क माफ केले जाईल. नाममात्र अनामत रक्कम रु. १००/- आकारण्यात येईल.
३. नवरात्रीत दसऱ्याला दुर्गा मूर्ती विसर्जन, गरबा विसर्जन यासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था, प्रकाशझोत दिवे, शौचालय, धुम्र फवारणी, स्वच्छता, निर्माल्य कलश इ. व्यवस्था गणेश विसर्जनाच्या धर्तीवर महापालिका प्रशासकीय विभागातर्फे उभारण्यात येईल. तसेच पोलीस प्रशासनाकडून महिलांच्या सुरक्षेची तसेच दागिन्यांच्या चोऱ्या होऊ नयेत म्हणून पुरेसा बंदोबस्त ठेऊन काळजी घेण्यात येईल. वाहतूक नियंत्रण व पार्किंग व्यवस्था याकडे विशेष लक्ष वाहतूक पोलीस देतील.
४. छटपूजेसाठी आवश्यक कृत्रिम तलावांची व्यवस्था, , प्रकाशझोत दिवे, शौचालय, धुम्र फवारणी, स्वच्छता, निर्माल्य कलश इ. व्यवस्था तसेच महिलांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र कक्ष अशी सर्व व्यवस्था प्रशासकीय विभागातर्फे करण्यात येईल.
५. छटपूजेसाठी १९ नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तसेच २० नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे सूर्योदयाच्यावेळी आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येईल.
६. नवरात्री, रास दांडिया, गरबा आयोजनाच्यावेळी महिला सुरक्षेसाठी महापालिका व पोलीस प्रशासन यांजकडून जनजागृती बॅनर्स लावण्यात येतील.

मुंबई शहरात १२०० हून अधिक नवरात्री मंडळे दरवर्षी अधिकृतरित्या परवानगी घेतात तसेच मुंबई शहरात ८२ हून अधिक ठिकाणी छटपूजेचे आयोजन केले जाते. भाजपा मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार व महायुती सरकारच्या पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई शहराच्या १५० वर्षांच्या इतिहासात प्रथमच हिंदू सणाबाबत तातडीने घेतलेल्या निर्णयाबद्दल सर्व नवरात्रोत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक मंडळ यांनी त्यांचे मन:पूर्वक आभार मानले.

सदर बैठकीत मुंबई भाजपा उपाध्यक्ष पवन त्रिपाठी, माजी गटनेते प्रभाकर शिंदे, माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, कमलेश यादव, विद्यार्थी सिंह, शीतल गंभीर – देसाई, दक्षा पटेल, प्रियांका मोरे, हरिष भांदिर्गे, सेजल देसाई तसेच मुंबई प्रवक्ता निरंजन शेट्टी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button