क्रीडा व व्यवस्थापन संस्थेने सर्वोत्तम खेळाडू घडवण्याचे ध्येय ठेवावे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
क्रीडा व व्यवस्थापन संस्थेने सर्वोत्तम खेळाडू घडवण्याचे ध्येय ठेवावे - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
प्रत्येक शैक्षणिक संस्थेने डोळ्यांपुढे निश्चित असे ध्येय ठेवून वाटचाल केली पाहिजे. क्रीडा व व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांनी देशासाठी सर्वोत्तम खेळाडू निर्माण करण्याचे ध्येय ठेवावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
विनीत कर्णिक लिखित ‘बिझनेस ऑफ स्पोर्ट्स : द विनिंग फॉर्मुला फॉर सक्सेस’ या क्रीडा व व्यवस्थापन क्षेत्रासंबंधित शैक्षणिक पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. ६) राजभवन मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलते होते.
कसोटी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट (आयआयएसएम) या संस्थेने सदर पुस्तक तयार केले असून पॉप्युलर प्रकाशनतर्फे प्रकाशित केले आहे.
अलीकडेच भारताने बॅडमिंटन मधील प्रतिष्ठेचा थॉमस कप जिंकल्याचे नमूद करून आजच्या स्पर्धात्मक युगात खेळाडूंमध्ये स्पर्धेसाठी जिद्द, उन्नत मनोबल तसेच सांघिक भावना निर्माण करणे गरजेचे आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना विविध क्षेत्रात चांगले खेळाडू घडवले गेले तर त्याचा देशाला फायदा होईल, असे राज्यपालांनी सांगितले.
पुस्तक निर्मिती क्षेत्रात आत्मनिर्भरता
भारतात क्रीडा आणि व्यवस्थापन या विषयातील अभ्यासक्रमाला लागणारी शेकडा ९८ टक्के पुस्तके विदेशी लेखकांची असतात असे नमूद करून आयआयएसएम ही संस्था क्रमिक पुस्तकांची मालिका भारतात निर्माण करून आत्मनिर्भरतेला चालना देणार असल्याचे आयआयएसएमचे संचालक निलेश कुलकर्णी यांनी सांगितले.
पूर्वी आयपीएल सारख्या स्पर्धांचे व्यवस्थापन विदेशी व्यवस्थापक करीत, परंतु आज त्या स्पर्धांचे व्यवस्थापन देखील भारतीयच करीत आहेत. यावर्षी क्रीडा क्षेत्रासाठी केंद्रीय अर्थसंकल्पीय तरतूद मोठ्या प्रमाणात वाढली याबद्दल आनंद व्यक्त करून देशातील कोणत्याही खेळाडूला पायाभूत व इतर सुविधांअभावी देशाबाहेर जावे लागू नये यासाठी क्रीडा व्यवस्थापन उत्कृष्ठ असले पाहिजे, असे श्री.कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी लेखक विनीत कर्णिक यांनी पुस्तकाची माहिती दिली.
कार्यक्रमाला बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिष चौहान, बीसीसीआय व आयपीएलचे मुख्याधिकारी हेमांग अमीन, टेबल टेनिसपटू कमलेश मेहता व मोनालिसा मेहता, पॉप्युलर प्रकाशनचे निशांत सबनीस, मिकी मेहता व क्रीडा व्यवस्थापन क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते.