संगीतरत्न सुधीर फडके यांच्या स्मृतीत मुंबईतल्या पहिल्या क्यूआर कोड चौकाचे उद्घाटन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते उद्घाटन
श्रीधर फडके सादर करणार गीतरामायण
मुंबई २९ नोव्हेंबर-
कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पेनेतून मुंबईतील पहिला क्यूआर कोड चौक तयार करण्यात आला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३० नोव्हेंबर रोजी त्याचे उदघाटन करण्यात येणार आहे. मुंबई शहरातील गावदेवी परिसरात असलेल्या ह्यूस मार्गावर गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा चौक उभारण्यात आला आहे. उदघाटन कार्यक्रमात सुधीर फडके यांचे पुत्र श्रीधर फडके गीतरामायणाचा कार्यक्रम सादर करतील.
संगीत क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणारे अष्टपैलू कलाकार म्हणजे सुधीर फडके. महाराष्ट्रातील रसिकांना अनेक वर्ष त्यांनी आपल्या प्रतिभेने मंत्रमुग्ध केले.
खरंतर कलारत्नांचे, महापुरुषांचे, थोर संतांचे, विचारवंतांचे अनेक चौक आणि पुतळे उभारले जातात पण शहरात येणाऱ्या पर्यटकांना अथवा स्थानिकांना त्यांच्याबाबत योग्य माहिती त्वरित मिळत नाही. बघताक्षणी हा पुतळा कोणाचा? अथवा या चौकाला ज्यांचे नाव दिलंय ते कोण? असे साधे प्रश्न विचारले जातात आणि अनेकदा अनुत्तरित राहतात. आपल्या आजूबाजूला घडणारी हि एक शुल्लक घटना म्हणून दुर्लक्ष न करता ती बदलण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी एक नवी संकल्पना प्रस्तुत केली. या संकल्पनेला मूर्तस्वरूप देतांना कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नातून संगीतकार सुधीर फडके यांच्या चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले आणि तेथे चौकात कायमस्वरूपी उपलब्ध राहील असा क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आला.
येथे येणाऱ्या पर्यटकांना किंवा स्थानिकांना एका शिले मध्ये कोरलेला क्यूआर कोड स्कॅन करून सुधीर फडके यांच्या जीवनकार्याचा माहिती काही क्षणात उपलब्ध होणार आहे.