वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध असल्याने आमचाही विरोधच ;
पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर आ. निकोले
मुंबई
डहाणू.
पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध असल्याने आमचाही विरोधच असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ. ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी नुकतेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर आपले मत व्यक्त केले आहे.
यावेळी आमदार निकोले म्हणाले की, वाढवण बंदर विरोध का ? यांचे आमच्या कडे प्रामुख्याने एकूण 08 मुद्दे आहेत. त्यातील क्र. 01) प्रस्तावित बंदर क्षेत्र हे पर्यावरणीय दृष्टीने संरक्षित आहे का ? 02) या भागातील आर्थिक विकासाचा दर चांगला असून लोकं स्वयंरोजगाराने परिपूर्ण आहेत. येथे डायमेकिंग, शेती, वाडी, बागायतदारी, मासेमारी मोठ्या प्रमाणावर चालते त्यामुळे परकीय चलन देखील मिळत असते. या सर्वांवर आधारित पूरक उद्योग तसेच त्यावर आधारित आदिवासी मजूर वर्ग अशी साखळी आहे. ज्याची संख्या लाखोंच्या घरात आहे. जे या बंदरामुळे विस्कळीत व उध्वस्त होणार आहे. 03) येथील लोकसंख्येची घनता देखील जास्त आहे. ज्यावर सामाजिक प्रदूषणाचा अंमल होऊन हे बंदर त्रासदायक ठरणार आहे. 04) बंदरासाठी लागणारी नैसर्गिक खोली जी 20 मीटर सांगितली जाते. ती गुजरात राज्यातील जयगड तसेच नारगोळ मध्ये देखील उपलब्ध आहे व नारगोळ हे ठिकाण प्रस्तावित वाढवण बंदरापासून अवघ्या 20 ते 25 किलोमीटरवर असून तेथे बंदर घोषित झालेले असताना वर सांगितलेल्या तिन्ही मुद्द्यांच्या तुलनेत आमचा भाग सुजलाम सुफलाम आहे. 05) झाई ते मुंबई पर्यंत ज्या मच्छीमारांच्या हजारो बोटी या भागात मासेमारी करतात कारण, हा माश्यांसाठी गोल्डन बेल्ट आहे. व तेथे 05 हजार एकरांचा भराव टाकल्याने मत्स्यबीज केंद्र नष्ट होणार आहे. तसेच खाडी व किनाऱ्यावर जी हजारो लोक मासेमारी करतात तीही नष्ट होणार आहे. 06) थर्मल पॉवरमधून निघणाऱ्या फ्लाईंग हॅश मुळे येथे चिकू, नारळ अश्या फळबागांवर विपरीत परिणाम झालेला आहे व या बंदरामुळे येथे दिवसाला 35 हजार ट्रक्स व उभ्या असणाऱ्या बोटी यातून निर्माण होणार धूर यातून जे प्रदूषण होणार आहे ते येथील फळबागा, शेती तसेच मानवी आरोग्य हे संपुष्टात येणार आहे. 07) 5 हजार एकरांवर जो भराव असणार आहे त्यासाठी जरी दमण च्या समुद्रातुन माती आणणार असले तरी देखील मोठ्या प्रमाणावर डोंगर व जंगल उध्वस्त होणार आहे. 08) एका बाजूला अणुशक्ती केंद्र व त्याद्वारे होणारे प्रदूषण त्याच्याबाजूला असलेल्या एमआयडीसी मधून होणारे प्रदूषण तसेच थर्मल पॉवर मधून होणारे प्रदूषण या सर्वांच्या मध्ये हा आणखी विनाशकारी प्रकल्प म्हणजे स्थानिकांनी स्वतः उध्वस्त होऊन देशाचा विकास कसा साधायचा ? या प्रश्नाचे उत्तर मात्र सरकार देत नाही. त्यामुळेच स्थानिकांबरोबर आमचा देखील वाढवण बंदराला विरोध आहे असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ. ज.) विधानसभा आमदार विनोद निकोले म्हणाले.
दरम्यान उक्त बैठकीस माकप आमदार कॉम्रेड विनोद निकोले हे देखील उपस्थित होते. त्यांनी जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांना गुजरात राज्यातील जिल्हा वलसाड येथील नारगोळ येथे देखील समुद्राची खोली 20 मीटर आहे तेथे बंदर करण्यास काय अडचण आहे ? असा प्रश्न उपस्थित केला असता बैठक सभागृहात सर्वांचे लक्ष केंद्रित झाले होते. त्यामुळे उत्तर देताना सेठी यांनी अतिशय सावधगिरी बाळगत उत्तर दिले.