मालाड सहकारी बँकेने ग्राहकांसाठी शुरू केली डिजिटल तत्काल सेवा
मुंबई
मालाड सहकारी बँकेने
आपल्या ग्राहकांसाठी क्यू आर कोड म्हणजेच तात्काळ प्रतिसाद सेवा ही डिजिटल सेवा प्रणाली सुरु केली आहे. शुक्रवारी बँकेच्या मध्यावर्ती कार्यालयात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात मुंबई महानगर पालिकेच्या परिमंडळ सातच्या डेप्युटी कमिशनर सौ भाग्यश्री कापसे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या आणि त्यांच्या हस्ते याचे उदघाटन झाले. कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष आणि मुंबई महानगरपालिकेतील भाजपा गटनेते, मा. नगरसेवक श्री विनोद मिश्रा, उपाध्यक्ष श्री हुकूम सिंह, वरिष्ठ संचालक श्री शरद साठे, श्री प्रतिमा रांभिया, श्री अनिल शर्मा, श्री सत्यप्रकाश पांडे, श्री विजय यादव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिपक कुलकर्णी, मुख्य व्यवस्थापक श्री अरुण गायकवाड आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते.
बँकेने आपल्या ग्राहकांसाठी तात्काळ प्रतिसाद ही डिजिटल सेवा इ – गेटपे या ॲप द्वारा प्रदान केली असुन त्याचा लाभ ग्राहकांना आणि बँकेला होणार आहे. तसेच या प्रणाली द्वारा कॅशलेस व्यवहार होऊन त्याला डिजिटल भारताच्या व्यवहाराची जोड मिळेल.
या प्रसंगी बोलताना बँकेचे अध्यक्ष श्री विनोद मिश्रा म्हणाले की मालाड सहकारी बँकेने प्रगती करताना ग्राहकांचे हित नेहमीच जपले आहे तसेच बँकेच्या ग्राहकांना अत्याधुनिक सेवा देण्याचा सतत प्रयत्न केला आहे. मालाड बँक देत असलेल्या सेवेवर ग्राहकांनी आपला विश्वास व्यक्त केला असून त्यामुळे बँकेची दिवसे दिवस प्रगती होताना दिसत आहे.
कार्यक्रमाच्या मुख्य पाहुण्या सौ भाग्यश्री कापसे यांनी बँकेच्या प्रगतीवर आणि बँक आपल्या ग्राहकांना देत असलेल्या विविध प्रकारच्या सेवा यावर समाधान व्यक्त करत बँकेची भविष्यात भरभराट होवो अशी इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांनी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. सध्या मुंबई महानगरात प्रदूषणाचा स्तर खुप वाढला आहे ज्यामुळे नागरिकांना खुप त्रास होत असुन विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. मुंबई महानगर पालिकेतर्फे प्रदूषण कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाय योजनांची त्यांनी माहिती उपस्थितांना दिली आणि दिवाळीत कमी फटाके वाजवून प्रदूषण रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी महानगर पालिकेला सहाय्य करावे अशी इच्छा व्यक्त केली.
या प्रसंगी उपस्थित बँकेच्या ग्राहकांना बँकेचे अध्यक्ष, अन्य संचालक आणि कार्यक्रमाच्या मुख्य पाहुण्या यांच्या मार्फत क्यू आर कोड चे स्कॅनर देण्यात आले.