ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच नंबर एक*
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची माहिती
मुंबई
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत दुपारी बारा वाजेपर्यंत जाहीर झालेल्या निकालावरून २१० ग्रामपंचायती जिंकत भारतीय जनता पार्टीच नंबर एक चा पक्ष ठरला आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केले. भाजपा प्रदेश मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. महायुती सरकारच्या विकास कार्यावर मतदार समाधानी असून मतदारांनी सरकारवर विश्वास दाखवत ७२३ पैकी तब्बल ४४१ ठिकाणी महायुतीला विजय मिळवून दिला असल्याचे श्री.उपाध्ये यांनी नमूद केले.
श्री. उपाध्ये म्हणाले की,वेळोवेळी विरोधकांकडून आणि विशेषकरून संजय राऊत यांच्याकडून “निवडणुका एकदा घेऊनच बघा मग चित्र स्पष्ट होईल” असे आव्हान दिले जात होते. राऊत यांच्यासारख्या नेत्यांना या निकालाने सणसणीत चपराक लगावली आहे. हाती आलेल्या ७२३ जागांच्या निकालांमध्ये भाजपा ला २१० जागी ,अजित पवार गटाला १२१ जागांवर तर शिंदे गटाला ११० जागांवर विजय प्राप्त झाला आहे.तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील शरद पवार गटाला ६५ ठिकाणी , कॉंग्रेसला ५१ ठिकाणी तर उद्धव टाकरे गटाला जेमतेम ३४ ठिकाणी यश मिळाल्याचे श्री. उपाध्ये यांनी सांगितले.राज्यात ‘महायुती’ ला महाविकास आघाडीपेक्षा तिप्पट जागी विजय मिळाला आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचा क्रमांक सर्वात शेवट लागल्याबद्दल श्री. उपाध्ये यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करत खोचक टीका केली.
बारामती तालुक्यात सर्व जागी महायुतीला विजय मिळाला असून मोहोळ तालुक्यातही भाजपाला १०० टक्के यश मिळाले आहे. कर्जत-जामखेड तालुक्यात रोहीत पवार यांना धक्का बसल्याचे तर जुन्नरमध्ये अमोल कोल्हे, वैभववाडी मध्ये वैभव नाईक यांना जनतेने स्पष्टपणे नाकारत धक्का दिला असल्याचे श्री. उपाध्ये म्हणाले. भाजपा हाच जनतेच्या मनातील पक्ष असून कुठल्याही स्तरावरची निवडणूक असो भाजपाच्या विकासकार्याला जनतेची पसंती मिळत असल्याचे श्री. उपाध्ये यांनी नमूद केले.