दिंडोशी मतदार संघ प्रभाग क्रं. ४३ मधील रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्ते विकासासाठी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचे आदेश
मुंबई,
मालाड (पूर्व ) दिंडोशी मतदार संघ, प्रभाग क्रमांक ४३ मधील त्रिवेणी नगरपासून जनरल अरुण कुमार वैदय मार्ग व संस्कार कॉलेज ते लक्ष्मण नगर जंक्शनपर्यंत डीपी रस्ते रुंदीकरण आणि प्रस्तावित नवीन रस्ते विकसीत करण्याबाबत आज (२७ ऑक्टोबर ) माननीय गृहनिर्माण मंत्री श्री अतुल सावे यांच्यासोबत बैठक पार पडली. लवकरच हे काम मार्गस्थ करण्याचे आदेश गृहनिर्माण मंत्री महोदयांकडून देण्यात आले आहेत. या बैठकित सचिव एसीएस श्रीमती वल्सा नायर सिंग आयएएस, एसआरए प्रमुख सतीश लोखंडे जी, सहायक आयुक्त श्री. किरण दिगावकर जी आणि संबंधीत अधिकारी उपस्थित होते.या कामासाठी मा.नगरसेवक श्री विनोद मिश्रा यांनी सतत पाठपुरावा केला होता.
दिंडोशी मतदार संघात अतिक्रमण आणि लोकवस्ती अफाट वाढल्यामुळे स्थानिकांना रस्त्यावर सुरळीत प्रवास करणे कठिण झाले होते. तसेच वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. यावर उपाययोजना म्हणून रस्ते रुंदीकरण आणि प्रस्तावित नवीन रस्ते विकसीत करण्याबाबत पत्र लिहून तसेच प्रत्यक्षपणे जावून श्री विनोद मिश्रा यांनी प्रभागातील समस्या वारंवार सरकार समोर मांडली होती. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. आता येणाऱ्या काळात प्रभागातील वाहतूक कोंडी कमी होईल आणि नागरिकांना सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध होईल.
या बैठकीत नगरसेवक श्री विनोद मिश्रा यांनी गृहनिर्माण मंत्री श्री अतुल सावे यांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद दिले.तसेच या कामामुळे प्रभागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असे मत व्यक्त केले.