विद्यार्थ्यांच्या सहभागातून नशा मुक्तीसाठी जनजागृती करू या
- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
‘ड्रग्ज फ्री मुंबई’ करण्यासाठी ‘स्टुडंट्स प्रहरी क्लब’चा शुभारंभ
मुंबई,
व्यसनांमुळे असंख्य तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होणे ही गंभीर बाब आहे. व्यसनांच्या विळख्यातून युवा पिढीला बाहेर काढण्यासाठी ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानांतर्गत ‘स्टुडंट्स प्रहरी क्लब’चा शुभारंभ करण्यात आला आहे. या माध्यमातून मुंबईसह राज्यभरातून ड्रग्ज हद्दपार करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते ‘स्टुडंट्स प्रहरी क्लब’ चा शुभारंभ करण्यात आला. यानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ. रवींद्र सिंघल, नशाबंदी मंडळाचे कार्याध्यक्ष आर. के. गायकवाड, सरचिटणीस वर्षा विद्या विलास, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. केसरकर म्हणाले, मुंबई शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवीत आहे. त्याबरोबरच आंतरिक स्वच्छता देखील आवश्यक आहे. विद्यार्थी संवेदनशील असतात, त्यांच्या सहभागातून शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबविले जात आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे ड्रग्ज मुक्त मुंबई अभियान यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
समाज हा पोलीस यंत्रणेचे डोळे असल्याचे सांगून मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, समाजाने नशा मुक्तीसाठी पोलिसांना सहकार्य करावे. समाजातील विविध प्रकारच्या दुष्प्रवृत्ती रोखण्यासाठी सर्वांनी मिळून वाटा उचलू या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी श्री.क्षीरसागर यांनी शासनाने नशामुक्तीसाठी विविध पावले उचलली असल्याची माहिती दिली. विद्यार्थी नशेसारख्या सवयींना लवकर बळी पडण्याची शक्यता असल्याने मंत्री श्री.केसरकर यांच्या संकल्पनेतून ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियान सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थी वाईट सवयींना बळी पडू नयेत ही समाजातील प्रत्येकाची जबाबदारी असून सर्वांनी या अभियानाला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानांतर्गत स्टुडंट्स प्रहरी क्लबच्या लोगोचे तसेच सहसाहित्याचे अनावरण करण्यात आले. मुंबईतील 450 शाळांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार असून केंद्र सरकारच्या ‘नशा मुक्त भारत’ अभियानाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेत दहा मुले व दहा मुली यांचा स्टुडंट्स प्रहरी क्लब स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ‘एक युद्ध नशे के विरूद्ध’ ही या अभियानाची घोषणा असणार आहे.