पोलिसांची कंत्राटी भरती करून तरुणांच्या भविष्याचा आणि सुरक्षेचा खेळखंडोबा करु नका:- नाना पटोले
राज्यातील भाजपाप्रणित सरकार गुजरातच्या आऊट सोर्सिंगवर चालते.
मराठा समाजाला दिलेले आरक्षणाचे आश्वासन भाजपाने पूर्ण करावे.
नागपूर, दि. १२ ऑक्टोबर
राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारने तरुणांच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नावर पाणी फेरले असून कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती सुरु करुन आरक्षणवरही घाव घातला आहे. सरकारचा हा निर्णय अत्यंत घातक व सुरक्षेच्यादृष्टीने गंभीर आहे. राज्यातील भाजपाप्रणित सरकार गुजरातच्या आऊट सोर्सिंगवर चालत आहे पण पोलीस भरती कंत्राटी पद्धतीने करुन तरुणांसोबतच महाराष्ट्राच्या सुरक्षेचा खेळखंडोबा करु नका, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला, ते पुढे म्हणाले की, मुंबई पोलीस दलात तीन हजार पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा जीआर सरकारने काढला आहे. पोलीस दलासारख्या सुरक्षेसाठी महत्वाच्या असलेल्या खात्यात कंत्राटी पद्धतीने भरती करणे हे अत्यंत चुकीचे आहे. पोलीस दल, तहसीलदार अशी महत्वाचे पदे ओऊटसोर्सिंगने भरून सरकार चुकीचा पायंडा पाडत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात नावलौकिक आहे, कंत्राटी पोलीस भरती करुन भाजपा सरकार महाराष्ट्राच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजवत आहे. कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करून राज्यातील येड्याचे सरकार महाराष्ट्राला काळिमा फासण्याचे काम करत आहे, हे काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही.
भाजपाने निवडणुका जिंकण्यासाठी जी काटेरी बीजे पेरली होती ती आता बाहेर निघत आहेत. भारतीय जनता पक्षाने २०१४ साली मराठा समाजाला १६ टक्के देतो असे आश्वासन दिले होते. सत्ता आल्यानंतर आरक्षण देणार असे छातीठोकपणे सांगत होते. २०१४ नंतर राज्यात व केंद्रातही भाजपचे सरकार आले असताना आरक्षणासाठी मराठा समाजाला मोर्चे का काढावे लागत आहेत? मराठा समाजाला जर आज आरक्षणासाठी मोर्चे काढावे लागत असतील तर त्याचे पाप भाजपाचेच आहे. सरकार अकार्यक्षम आहे कोणत्याही समाजघटकांना न्याय देऊ शकत नाही म्हणून विविध समाजघटक मोर्चे काढून न्यायाची मागणी करत आहेत.
नागपूर विभागाची आढावा बैठक संपन्न.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर येथे नागपूर विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. विदर्भात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर देणे तसेच उदयपूर शिबिरातील निर्णयांची अंमलबजावणीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त जागांवर विजय मिळावा यासाठी संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.
या बैठकीत नागपूर वर्धा, गोंदीया गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. नितिन राऊत, सुनिल केदार, अनिस अहमद, सतिश चतुर्वेदी, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, आ. अभिजित वंजारी, नागपूर शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सोशल मीडियाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, प्रदेश सरचिटणीस शाम उमाळकर यांच्यासह नागपूर विभागातील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.