व्हायब्रंट गुजरात समिटबाबत महाराष्ट्र सरकारचा मौन का – महेश तपासे
मुंबई ११ ऑक्टोबर :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) पुन्हा एकदा गुंतवणुक आकर्षित करण्यात महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस व पवार सरकार अपयशी असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.
गुजरातचे भाजप सरकार मुंबईत व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट आयोजित करत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी शिंदे सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला.
गुजरातचे भाजप सरकार महाराष्ट्रात व्यावसायिकांना आकर्षित करण्यासाठी कार्यक्रम घेत असताना शिंदे सरकार गप्प का असा सवाल तपासे यांनी उपस्थित केला.
40 आमदारांना वर्षभर सांभाळलं परंतु 40 मोठे उद्योग वर्षभरात राज्यात आणू शकलं नाही असं हे अपयशी सरकार महाराष्ट्राला लाभल्याचा पुनरुच्चार तपासे यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी हिम्मत दाखवून गुजरात मध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम भरवावा व गुजरात मधील उद्योग महाराष्ट्रात खेचून आणावे परंतु केंद्रीय भाजप नेत्यांच्या भीतीपोटी ते तसे करणार नाही कारण तसे केल्यास त्यांना स्वतःचे पद गमवावे लागेल असा टोला महेश तपासे यांनी लगावला.
पुढे तपासे म्हणाले महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आजही शरदचंद्र पवार साहेबांवर आहे कारण त्यांनी राज्यांमध्ये उद्योगाची भरभराटी केली, शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणल्या कर्जमुक्ती केली तसेच तरुणांच्या रोजगारासाठी भरीव कामगिरी केली परंतु या सर्व गोष्टींवर विद्यमान सरकार अपयशी असल्याची टीका महेश तपासे यांनी केली.