बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

महात्मा गांधी यांचा अहिंसेचा मंत्र जगाने स्वीकारला

- मंत्री सुधीर मुनगंटीवार

लंडन, दि. 3 :

महात्मा गांधींनी दिलेला अहिंसेचा मंत्र जगाने स्वीकारला आहे, असे उद्गार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लंडन काढले. आज गांधी जयंतीनिमित्त (2 ऑक्टो.) लंडन येथील अव्हॉस्टिक चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, भगवान श्रीकृष्णाच्या भूमीत जन्मलेल्या आणि जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती ‘वसुधैव कुटुंबकम’ या भावनेने जगात सर्वत्र साजरी केली जाते; आपण सर्वच महात्मा गांधी यांच्या भूमीतून आलो आहोत, याचा अभिमान असल्याचे सांगून मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी भारतरत्न माजी प्रधानमंत्री दिवंगत लालबहादूर शास्त्री यांनाही जयंतीनिमित्त भावांजली अर्पण केली.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, लंडनमध्ये महात्मा गांधींना अभिवादन करण्याची संधी मला मिळाली, याचा आनंद वाटतो. महात्मा गांधी यांनी स्वावलंबनाचा मंत्र सर्व जगाला दिला. चरखा हे स्वावलंबनाचे माध्यम म्हणून समाजाला दिले. ज्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमातून 1930 ते 1948 या काळात वास्तव्यास राहून संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेश दिला, त्या सेवाग्राम येथे पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी आपल्याला मिळाली व जगातील सर्वात मोठा चरखा उभारण्याचे भाग्य आपल्याला प्राप्त झाल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. अहिंसेचे आयुध म्हणून महात्मा गांधींनी चरख्याचा उपयोग केला. प्रेमाचा संदेश देत “ज्योत से ज्योत जलाते रहो” या भावनेने त्यांनी “जियो और जिने दो” ही भावना प्रत्येकात रुजविण्याचा जीवनभर प्रयत्न केला. लंडन येथे महात्मा गांधी यांच्या जयंती कार्यक्रमास उपस्थित राहून आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली हे मी स्वत:चे भाग्य समजतो, असेही मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले.

भारतरत्न माजी प्रधानमंत्री दिवंगत लालबहादूर शास्त्री यांच्याही जयंतीनिमित्त मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचे आवर्जून स्मरण आपल्या भाषणात केले. भारताला स्वावलंबी बनविणाऱ्या, ‘जय जवान जय किसान’ अशी घोषणा देऊन कृषी क्रांतीला चालना देणाऱ्या दि.लालबहादूर शास्त्रींचेही जयंतीदिनी स्मरण केलेच पाहिजे, ते आपले कर्तव्यच आहे, असेही म्हणाले.

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, कॅमेडेनच्या उमहापौर समता खातून, स्थानिक डेप्युटी हाय कमिशनर, ब्रिटिश संसदेतील खासदार वीरेंद्र शर्मा, स्थानिक सुरक्षा व लष्कर सल्लागार, स्थानिक भारतीय नागरिक मंडळाचे पदाधिकारी अल्पेश पटेल, सी. बी. पटेल, प्रसिद्ध लेखक अमीश पटेल, महाराष्ट्र पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button