मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज विचार जागर स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज विचार जागर स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण
नाशिक,
दि.२१ ऑगस्ट :-
इलाईट सर्टिफिकेशन्स अॅण्ड इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स संस्थेंच्या वतीने नुकतीच राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार जागर स्पर्धा परिक्षा घेण्यात येऊन निकाल जाहीर करण्यात आले. या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना आज राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करून गौरविण्यात आले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाचे औचित्य साधून इलाईट सर्टिफिकेशन्स अॅण्ड इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स संस्थेंच्या वतीने राजर्षी शाहू महाराज विचार जागर स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इयत्ता ७ वी ते इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत लखमापूर दिंडोरी येथील कु.वंशिका अनिल सोनवणे हिने प्रथम १ लाख रुपयांचे पारितोषिक पटकाविले. तसेच ५० हजारांचे द्वितीय पारितोषिक चिखलओहळ मालेगाव येथील कु. कोमल रतन त्रिभुवन, १० हजारांचे तृतीय पारितोषिक दिंडोरी येथील कु.सोनल संजय दरोडे, मालेगाव येथील कु.अपूर्व आनंद बुरड व नाशिकरोड येथील अनुराग राजेंद्र पांडे याने पटकाविले.
या सर्व पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांना भुजबळ फार्म नाशिक येथील कार्यालयात राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मंत्री छगन भुजबळ यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे आबासाहेब थोरात, स्वप्ना थोरात यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.